अहमदनगर : माता-पित्यांनी लग्न ठरविल्यानंतर अनेक मुली इच्छा नसताना ही स्वप्नांना मुरड घालून निमुटपणे बोहल्यावर चढतात. नगरमधील एक मुलगी मात्र याला अपवाद ठरली आहे. इच्छेविरोधात ठरलेल्या लग्नाला तिने ठामपणे विरोध करत थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर भरोसा सेलमधील अधिकाऱ्यांनी त्या मुलीच्या नातेवाईकांचे मनपरिवर्तन केले अन् दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्न अखेर सर्वांच्या संमतीने रद्द झाले. अकाली हातात पडणारी लग्नाची बेडी सैल झाल्याने त्या मुलीला आश्रू अनावर झाले.
नगर शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील १९ वर्षीय मुलगी पदवीच्या पहिल्या वर्षांत शिक्षण घेत आहे. शिक्षण पूर्ण करून स्वत:च्या पायावर उभा राहायचे आणि आयुष्यात काहीतरी करून दाखवायचे अशी तिची जिद्ध आहे. आई-वडिलांनी मात्र काही दिवसांपूर्वी तिचे अचानक लग्न ठरविले. मुलीने या लग्नाला विरोध केला. कुटुंबीय मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. २९ जुलै रोजी साखरपुडा आणि दुसऱ्या दिवशी लग्न अशी तारीख निश्चित झाली. मुलीची घालमेल मात्र वाढत होती. आई-वडील ऐकत नसल्याने तिने २७ जुलै रोजी थेट जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे तक्रार केली. अधीक्षक पाटील यांनी हा अर्ज भरोसा सेलकडे पाठवून तत्काळ कार्यवाही करण्याचा आदेश दिले. भरोसा सेलच्या उपनिरीक्षक पल्लवी उंबरहंडे यांनी त्या मुलीच्या माता-पित्यांना तत्काळ नोटीस काढून कार्यालयात आणले. उंबरहंडे यांनी मुलीच्या आई-वडील व इतर नातेवाईकांना समजावून सांगितले. ते मात्र हट्टालाच पेटलेले होते. शेवटी त्यांचे मनपरिवर्तन करण्यात यश आले आणि दोन दिवसांवर आलेले लग्न थांबले. उपनिरीक्षक उंबरहंडे यांच्यासह उपनिरीक्षक अरविंद माने, गावित, सहायक फौजदार राजेंद्र वाघ, कॉन्स्टेबल योगिता साळवे, अनिता विधाते, लाटे, कोळेकर यांच्या पथकाने ही कार्यवाही पूर्ण केली.
--------------
रात्री नऊपर्यंत सुरू होते नातेवाईकांचे समुपदेशन
दोन दिवसांवर आलेल्या लग्नाची घरात जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईक लग्नासाठी घरी आलेले होते. अशा परिस्थितीत फक्त मुलीचा विरोध आहे म्हणून लग्न थांबविणे शक्य नाही. असा पवित्रा त्या मुलीचे आई-वडील आणि नातेवाईकांनी घेतला. भरोसा सेलच्या प्रमुख पल्लवी उंबरहंडे यांनी मात्र शांततेने त्या मुलीचे आई-वडील आणि इतर नातेवाईकांना समजावून सांगितले. मुलीच्या इच्छेविरोधात तिचे लग्न लावून दिले तर तिचे आयुष्य उद्ध्वस्त होईल, ती आयुष्यात सुखी होणार नाही. अशा पद्धतीने रात्री नऊपर्यंत समजूत घातली. त्यानंतर लग्न थांबविण्यात आले.
----------------------
एका कुटुंबातील दोन दिवसांवर येऊन ठेपलेले लग्न थांबविणे मोठे आव्हानात्मक काम होते. मात्र जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर मुलीच्या तक्रारीची तत्काळ दखल घेण्यात आली. प्रयत्नाअंती मुलीच्या नातेवाईकांचे परिवर्तन करण्यात आम्हाला यश आले. तसेच प्रत्येक मुलीला स्वत:च्या मर्जीप्रमाणे जीवन जगण्याचा अधिकार आहे. या अधिकारावर कुणीही अतिक्रमण करू शकत नाही. अशी परिस्थिती ओढावलेल्या महिलांना भरोसा सेलच्या माध्यमातून सर्वोतपरी मदत केली जाते.
- पल्लवी उंबरहंडे, उपनिरीक्षक भरोसा सेल, अहमदनगर