अहमदनगर : जिल्ह्यात मंगळवारी दुपारी सर्वच खासगी रुग्णालयांत दोन- चार तास पुरेल एवढाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक होता. त्यामुळे अनेक खासगी रुग्णालयांतील डॉक्टरांनी ऑक्सिजन मिळाला नाही, तर रुग्णांचे प्राण वाचविण्यात हतबलता व्यक्त केली होती. त्यानंतर डॉक्टर, रुग्णांचे नातेवाईक यांचा जीव टांगणीला लागला होता. लोकप्रतिनिधी, डॉक्टर, उद्योजकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून काही कंपन्यांमधील ऑक्सिजन सिलिंडर खासगी रुग्णालयांना दिले. ही तात्पुरती व्यवस्था झाल्याने रुग्णांचा जीव वाचविण्यास मोठी मदत झाली. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री १९ मेट्रिक टन (१९ के.एल. ) क्षमतेचा एक टँकर मिळाला आणि सर्वांच्याच जिवात जीव आला. ऑक्सिजन मिळाला नसता तर नगरमध्येही मंगळवारची रात्र ‘काळरात्र’ ठरली असती.
नगर जिल्ह्यासाठी रोज ६० टन ऑक्सिजन लागतो. मात्र, गेल्या चार दिवसांत केवळ १५ टन ऑक्सिजन मिळाला होता. दरम्यान, उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या २१ हजारांपर्यंत गेली असून, रुग्णालयात गंभीर रुग्णही वाढले आहेत. त्यामुळे मंगळवारी अनेक खासगी रुग्णालयांत ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी मोठी धावपळ करावी लागली. ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रुग्णांवर उपचार करू शकत नाही, अशी हतबलता डॉक्टरांनी व्यक्त केली होती. आमच्याकडे ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णांची जबाबदारी आम्ही घेऊ शकत नाही, असे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगताच अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. त्यानंतर फोनाफोनी सुरू झाली. लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक, डॉक्टरांची ऑक्सिजन मिळविण्यासाठी एकच धावपळ सुरू झाली. मंगळवारी सायंकाळी दोन तास पुरेल एवढीच ऑक्सिजनची उपलब्धता होती. मात्र, काही उद्योजकांनी त्यांच्याकडील काही सिलिंडर काही खासगी रुग्णालयांना दिले. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचले. हा ऑक्सिजन दोन ते तीन तास पुरेल एवढाच होता. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची रात्रभर ऑक्सिजनसाठी लढाई सुरूच होती. मंगळवारी मध्यरात्री पुणे जिल्ह्यातील कंपनीमधून १९ मेट्रिक टन क्षमतेचा ऑक्सिजनचा टँकर जिल्हा रुग्णालयाला मिळाला. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईक, डॉक्टरांना दिलासा मिळाला. रात्रीतूनच जिल्हा रुग्णालयातून ड्युरो सिलिंडरद्वारे खासगी रुग्णालयांना ऑक्सिजन वितरित करण्यात आला, तसेच बुधवारी दिवसभरात १० मेट्रिक टन (१० के.एल.) ऑक्सिजनचा दुसरा टँकर मिळाला. त्यामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यास मदत झाली.
------
अधिकाऱ्यांनी अडवले दोन टँकर
नगरला येणारे दोन टँकर पुणे हद्दीत येताच ते पुणे येथील अन्न व औषध प्रशासनाच्या पथकातील अधिकाऱ्यांनी अडवले. पुणे जिल्ह्यातील उत्पादक कंपनीमधून टँकर बाहेर पडताच तो एका ठिकाणी थांबविण्यात आला. ही बाब महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना समजल्यानंतर त्यांनी थेट मुख्य सचिवांशी संपर्क साधला. सदरचे टँकर नगर जिल्ह्यासाठी असून त्यास अडवू नये, असे बजावून सांगितले. त्यानंतर टँकरचा मार्ग मोकळा झाला.
-----------
सध्या ऑक्सिजन हा प्राणवायू झाला आहे. त्यामुळे उपलब्ध झालेल्या ऑक्सिजनमधून समप्रमाणात, रुग्णसंख्येच्या प्रमाणात तो रुग्णालयांना वाटप झाला पाहिजे. पुणे जिल्ह्यातून निघालेला टँकर थांबविण्यात आल्याचे कळाल्यानंतर तात्काळ मी मुख्य सचिवांशी बोललो. त्यानंतर टँकर नगर जिल्ह्यात आला. नगरमध्ये वाईट परिस्थिती आहे. किती लोकांचे प्राण गेले असते, ते माहिती नाही. रात्र काळरात्र ठरली असती. त्यामुळे टँकर थांबविणे उचित नसल्याचे कटू भाषेत मुख्य सचिवांना सांगितले.
-बाळासाहेब थोरात, महसूलमंत्री
--------
नगर जिल्ह्यातील ऑक्सिजनचे टँकर पुण्याच्या अधिकाऱ्यांनी अडवून ठेवले. ही माहिती समजल्यानंतर याबाबत मी स्वत: मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतर टँकर जिल्ह्यात येण्याचा मार्ग मोकळा झाला. या प्रकारामुळे जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचा निष्काळजीपणाच समोर आल्याचे दिसते आहे. पालकमंत्री बैठका घेऊन निघून गेले. जिल्ह्यातील तिन्ही मंत्री अपयशी ठरले आहेत.
-आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री
-----------------------------
जिल्ह्यात मंगळवारी रात्री १९ मेट्रिक टन क्षमतेचा एक टँकर मिळाला. बुधवारी दिवसा १० मेट्रिक टन क्षमतेचा दुसरा टँकर मिळाला, असा एकूण २९ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला. जिल्ह्याची गरज एका दिवसाला ६० मेट्रिक टन आहे. आणखी १० मेट्रिक टनची गरज आहे. उद्या पुन्हा ऑक्सिजन मिळविण्यासाठी प्रयत्न अखंड चालूच राहणार आहेत.
-संदीप निचित, निवासी उपजिल्हाधिकारी
--------------
एक फोटो आहे