अहमदनगर : जिल्ह्यातील तीव्र टंचाईची परिस्थिती असलेल्या ठिकाणांची मंडलनिहाय माहिती तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने प्रांत अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना दिले आहेत़ मंडलनिहाय चाऱ्याचा एकत्रित अहवाल सोमवारी सरकारला पाठविण्यात येणार असल्याचे समजते़शनिवारी नियोजन भवनात झालेल्या टंचाई आढावा बैठकीत पालकमंत्री राम शिंदे यांनी आठवडाभरात छावण्या सुरू करण्याचे जाहीर केले आहे़ या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील तीव्र टंचाई परिस्थिती निर्माण झालेल्या ठिकाणांचा अहवाल तत्काळ पाठविण्याचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिले असल्याचे समजते़ मंडलनिहाय गावांतील चाऱ्याचा अहवाल तयार करण्याचे काम रविवारी सुटीच्या दिवशीही तहसील कार्यालयांत सुरू होते़ पहिल्या टप्प्यात दक्षिण नगर जिल्ह्यातील नगर, पाथर्डी, कर्जत आणि जामखेड तालुक्यातील टंचाई परिस्थितीची माहिती मागविली आहे़ ही माहिती प्राप्त झाल्यानंतर ती सरकारला पाठविली जाईल़ तीव्र टंचाई असलेल्या भागांसाठी जनावरांच्या छावण्या सुरू करण्यात येणार आहेत़ त्यावर मंत्रालयात निर्णय होणार असून, पुढील एप्रिलमध्ये छावण्या सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे़ जनावरांच्या छावण्या सुरू करण्यासाठी कर्जत, जामखेडमधून प्रस्ताव प्राप्त झाले आहेत़
चारा छावण्यांसाठी माहिती मागविली
By admin | Updated: March 20, 2016 23:17 IST