पिंपळगाव माळवी : नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथे कोरोनाचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी श्रीराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तीन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय शालेय व्यवस्थापन समितीच्या सोमवारच्या बैठकीत घेण्यात आला.
नोव्हेंबर महिन्यापासून शासनाचे सर्व नियम पाळून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. त्यानंतर जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग देखील सुरू झाले होते. विद्यार्थीसंख्या समाधानकारक होती. परंतु, मागच्या आठवड्यात पिंपळगाव माळवी येथे सात नवीन कोरोना रुग्ण आढळल्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीची बैठक घेण्यात आली. पुढील महिन्यापासून दहावी व बारावीची बोर्ड परीक्षा असल्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय समितीचे अध्यक्ष रामनाथ झिने, प्राचार्य अर्जुन खळेकर, पर्यवेक्षक संभाजी पवार, सरपंच राधिका प्रभुणे, उपसरपंच भारती बनकर, वैद्यकीय अधिकारी सानप, आरोग्यसेविका मीना ससे, ग्रामपंचायत सदस्य बापू बेरड, सुधीर गायकवाड, पत्रकार खासेराव साबळे, सुदाम गुंड, मनीषा झिने, द्वारका झिने उपस्थित होते. सूत्रसंचालन आदिनाथ घोरपडे यांनी केले.