श्रीगोंदा : नगर व श्रीगोंदा तालुक्याच्या सीमारेषेवरील उख्खलगाव येथील डोंगर कुशीतील वाळके मळ्यातील शाळेला अवघ्या दीड वर्षात आयएसओ मानांकन मिळून शाळा डिजिटल झाली आहे. शाळेत लोकसहभागातून अनेक उपक्रम राबवून पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या. यासाठी अनिल हंडोरे, वैशाली हंडोरे या दाम्पत्य शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. या शाळेची दुरवस्था झाल्याने शाळा अखेरची घटका मोजत होती. दीड वर्षापूर्वी शाळेवर हंडोरे दाम्पत्याची नियुक्ती झाली होती. शाळेची दुरवस्था पाहून शाळेतून बदली करुन घ्यावी, असा विचार त्यांच्या मनात होता. परंतु अनिल हंडोरे यांच्यावर आदर्श हिवरे बाजारचा प्रभाव होता. पोपट पवार यांचे कार्य डोळ्यासमोर ठेवून हंडोरे दाम्पत्यानी शाळा सुधारण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिले. सुरुवातीला शाळेसाठी भक्कम इमारत बांधून घेतली. त्यासाठी जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार व कार्यकारी अभियंता राहुल वाळके यांनी विशेष मदत केली व नागरिकांशी संपर्क वाढवून लोकसहभागातून शाळेच्या कायापालटाचा विचार ग्रामस्थांमध्ये रूजविला. सुरुवातीला शाळेसाठी मैदान तयार करून घेतले. विद्यार्थ्यांवर संस्कार, त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी शाळेत विविध दिन उपक्रम व वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले. त्यामध्ये गावातील पदाधिकारी व पालकांना सामावून घेतले. शाळा परिसरात वृक्षारोपण, बगिचा, विद्यार्थ्यांना पिण्यासाठी अत्याधुनिक सुविधा, बोअरवेलरवर पंप, शौचालय, हॅण्ड वॉशिंग सेन्टर अशा सुविधा करुन शाळेचा परिसर आकर्षक केला. (तालुका प्रतिनिधी)
उख्खलगाव येथील शाळा लोकसहभागातून डिजिटल
By admin | Updated: September 27, 2016 23:57 IST