नेवासा : सध्या जिल्हाभर विषाणूंचा संसर्ग प्रचंड प्रमाणात वाढत असताना इयत्ता पाचवी व आठवीचे शिष्यवृत्ती वर्ग सुरू करू नयेत, याबाबतचे निवेदन नुकतेच महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आले.
कोरोना विषाणूचा संसर्ग वाढल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी यांनी दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता इतर सर्व वर्ग बंद करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची परीक्षा २३ मे रोजी होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. आतापर्यंत मुलांना शिष्यवृत्तीसंदर्भात शिक्षकांनी मार्गदर्शन केले व करत आहेत. काही तालुक्यांत मुलांना सराव परीक्षेच्या नावाखाली केंद्र शाळेत एकत्रित केले जाते. शिक्षकांनाही त्यासाठी एकत्र यावे लागते. सध्याच्या परिस्थितीत ही बाब अत्यंत जोखमीची आहे. या सर्व गोष्टी तोंडी आदेशानुसार केल्या जातात. शिक्षण विभागाने या बाबतीत कुठलाही लेखी आदेश काढलेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे.