उपनगराध्यक्ष सचिन कोते, गटनेते अशोक गोंदकर, नगरसेवक जगन्नाथ गोंदकर, नितीन उत्तम कोते व रवींद्र कोते यांनी साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांची भेट घेतली. यावेळी संस्थानचे डेप्युटी सीईओ रवींद्र ठाकरे, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे हे उपस्थित होते.
कोविडमुळे दीड वर्षापासून साईनगरीतील अर्थकारण ठप्प झाले आहे. हॉटेल, रेस्टॉरंट, हार-फुलांचे दुकान मालक कर्जाचे हप्ते, वीज बिले, मालमत्ता कर आदींमुळे मेटाकुटीला आले आहेत. अनेकांच्या आस्थापनांची वीज तोडण्यात आली आहे तर अनेक मालमत्तांवर जप्ती आली आहे. दुसरीकडे कामगार व मोलमजुरी करणाऱ्यांच्या हाताला काम राहिले नाही. तात्पुरता रोजगारही उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. साईसंस्थानने या आपत्तीत गोरगरिबांना व गरजूंना अन्नदानाच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याची वेळ आली आहे. साईसंस्थानने प्रसादालय सुरू करावे किंवा अन्न पाकिटे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नगरसेवकांनी संस्थानला केली आहे.
.................
शहरातील गोरगरिबांना अन्न पाकिटे द्यावीत, असा प्रस्ताव नगरसेवकांनी दिला आहे. मानवतेच्या दृष्टीने मांडण्यात आलेला हा प्रस्ताव तदर्थ समिती समोर विचारार्थ ठेवला जाईल.
-कान्हुराज बगाटे, सीईओ, साईसंस्थान