अहमदनगर : ‘साहेब, कोरोनाचं संकट वाढत होत आणि गावात निवडणूक लागली; पण हे संकट ओळखून गावकऱ्यांनी निवडणूक बिनविरोध केली. कोरोनाच्या संकटाचा एकजुटीने सामना केला. गेले पंधरा दिवसांपासून गावात एकही रुग्ण आढळून आला नाही. आता आम्ही गाव कोरोनामुक्त करणार आणि बक्षीसपण पटकाविणार..’ अशा शब्दांत अहमदनगर जिल्ह्यातील निमगाव बुद्रुक (ता. संगमनेर)चे सरपंच प्रकाश कानवडे यांनी गावाने कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली. त्यांच्या या लढ्याचे ठाकरे यांनीही कौतुक केले.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवारी दूरदृश्यप्रणालीद्वारे राज्यातील काही विभागातील सरपंचांशी संवाद साधला. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, राज्य आदर्श गाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार सहभागी झाले होते. यामध्ये कानवडे यांना मुख्यमंत्र्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांतील सरपंचांशी संवाद साधला. त्यात निमगाव बुद्रुकचे सरपंच प्रकाश कानवडेंना प्रथम संधी मिळाली. त्यांनी गावाच्या कोरोनामुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांची, त्यासाठी गावातील व्यक्तींनी, प्रशासनाने केलेल्या सहकार्याची माहिती दिली. ते म्हणाले, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमे अंतर्गत पथके स्थापन करून सर्वेक्षण सुरू केले. दहा टीम करून पन्नास कुटुंबांचे सर्वेक्षण करीत होतो. संशयितांना जिल्हा परिषद शाळेत भरती केले. नंतर त्यांच्या चाचण्या करून बाधित आलेल्या रुग्णांना लोकसहभागातून सुरू केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये भरती केले. ज्या व्यक्ती त्या सेंटरमध्ये दाखल होण्यास कचरत होत्या, त्यांना तालुक्याच्या गावी पाठविले. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सीसीटीव्ही बसविले. त्याचा चांगला परिणाम झाला.
‐---------
कोरोनामुक्त गाव ही लोकचळवळ बनावी : पोपटराव पवार
पद्मश्री पोपटराव पवार यांनीही यावेळी सरपंचांना मार्गदर्शन केले. कोरोनामुक्त गाव ही केवळ स्पर्धा नव्हे, तर चळवळ व्हायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हिवरे बाजारने कोरोनाला हरविले. त्यासाठी गावातच विविध पथकांची स्थापना करून प्रत्येकाला जबाबदारी सोपविली. प्रत्येकाने ती पार पाडली. गावागावांनी त्यासाठी आता पुढे यायला हवे. हिवरे बाजारने केलेल्या या प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वीच घेतली. त्यातून कोरोनामुक्त गाव संकल्पना पुढे आली. पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी डॉ. भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर यांनी प्रत्यक्ष भेट देऊन संकल्पना समजावून घेतली. त्याची अंमलबजावणी आता संपूर्ण जिल्ह्यात होत असून, चारशेहून अधिक ग्रामपंचायती आणि पाचशेहून अधिक गावे कोरोनामुक्त झाली आहेत, असे पवार यांनी सांगितले.