कोपरगाव : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद, नवी दिल्लीने ( एआयसीटीई ) संजीवनी पाॅलिटेक्निकडून प्रस्ताव मागितला होता. त्यानंतर दूरभाष्य प्रणालीच्या माध्यमातून सादरीकरण घेऊन संजीवनी पाॅलिटेक्निकला आता इतर पाॅलिटेक्निकला मार्गदर्शन करण्यासाठी ‘मेंटर’ संस्था म्हणून दर्जा दिला आहे. त्यामुळे पाॅलिटेक्निक संस्थांमधील मेंटर दर्जा प्राप्त संजीवनी ही एकमेव संस्था आहे, अशी माहिती संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी दिली.
कोल्हे म्हणाले, देशात एआयसीटीईच्या अखत्यारीत सरकारी व खासगी मिळून १०, ४०० मान्यता प्राप्त तांत्रिक शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत. पैकी फक्त ९२२ संस्थांना एनबीए मानांकन प्राप्त आहे. या ९२२ संस्थांपैकी संपूर्ण भारतात फेब्रुवारी अखेरच्या आकडेवारीनुसार फक्त ४० संस्थांना ‘मेंटर’ संस्था म्हणून दर्जा प्राप्त आहे. त्यात महाराष्ट्रातील आत्तापर्यंत फक्त ३ संस्थांचा समावेश होता, या संदर्भातील अद्ययावत माहितीनुसार संजीवनी पाॅलिटेक्निक ही राज्यातील चौथी मेंटर संस्था म्हणून ओळखली जाणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये विविध मूल्यांची रूजवण व्हावी, शिक्षकांनी आपापल्या क्षेत्रातील अद्ययावत ज्ञान आत्मसात करावे, इत्यादी बाबींच्या मार्गदर्शनासाठी ज्या संस्थांमध्ये या सर्व बाबींचा अवलंब केला जातो, अशा संस्थांना सर्व निकष पूर्ण केल्यावर इतर संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी निवडक संस्थांना मेंटर दर्जा देऊन अशा संस्थांनी इतर संस्थाना बरोबर घेऊन दर्जा व गुणवत्तेच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात संजीवनीला अग्रक्रम देण्यात आला आहे. ही संजीवनीच्या दृष्टीने एक ग्रामीण भागातील संस्था म्हणून मोठी उपलब्धी आहे. मेंटर संस्था योजनेंतर्गत संजीवनी पासून २०० किमी त्रिज्येच्या आतील तांत्रिक विशेषतः ७ पाॅलिटेक्निक संस्थांची जबाबदारी संजीवनीवर सोपविली आहे.