संगीत गुणात्मकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहणाऱ्या डॉ. संगीता पारनेरकर या पूर्णवाद परिवाराचे प्रमुख विष्णू महाराज पारनेरकर यांच्या स्नुषा असून संगीताच्या प्रसारासाठी त्यांनी ओम पूर्णवादी संगीत कला अकादमीच्या माध्यमातून राज्यभर काम करीत आहेत. देश विदेशात आपल्या संगीत साधनेचा विस्तार त्यांनी केला आहे. संगीत क्षेत्रातील पहिले ई मासिक ‘खयाल’ ची निर्मितीही त्यांनी केली आहे. स्वर योगिनी डॉ. प्रभा अत्रे आणि पंडिता शुभदा पराडकर यांचे त्यांना प्रोत्साहन मिळाले. प्रबंध सादर करण्यासाठी त्यांना डॉ. विकास कशाळकर यांनी मार्गदर्शन केले. संगीत विषयात डाॅक्टरेट मिळवणाऱ्या भारती विद्यापीठाच्या त्या पहिल्या विद्यार्थिनी आहेत. याबद्दल स्कूल ऑफ परफाॅर्मिंग आर्टसच्या सर्व विभाग प्रमुखांचे त्यांचे कौतुक केले आहे.
संगीत क्षेत्रात हा प्रबंध आदर्श आणि अभ्यासपूर्ण ठरेल याचा विश्वास वाटतो. मूळ विषयावर योग्य पद्धतीने मांडणी करुन हा प्रबंध संगीत क्षेत्रात काही वेगळे आणि दर्जेदार योगदान देऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी विशेष तयार झाला आहे असे वाटते, असा आत्मविश्वास पारनेरकर यांनी व्यक्त केला आहे.
रियाज हा गायनाचा मूळ गाभा आहे. आजच्या काळात या विषयाच्या अभ्यासाची नितांत गरज आहे. श्रोते सर्वत्र आहेत मात्र नेमके काय ऐकावे आणि कसे ऐकावे याची शास्त्रशुद्ध रीत माहीत नाही. या प्रबंधात त्यांनी ऐतिहासिक दाखले, खयाल गायकीचा प्रवास त्यातील विशिष्ट घटना, नमुने आणि उदाहरण देत रियाजाचे महत्त्व आणि भूमिका प्रबंधात विशद केली आहे.
-
फोटो- २८ संगीता पारनेरकर