जामखेड : आमदार राेहित पवार यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर जामखेड येथे शंभर खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. मंजुरीचे पत्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बुधवारी (दि. ३१) दिले आहे.
तीन जिल्ह्याच्या सीमेवर असणारे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेडची ओळख आहे. येथील बाजारपेठ, व्यापारी पेठ मोठी असल्याने तीन जिल्ह्यातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर वावर जामखेड शहरात असतो. तसेच अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. सध्या येथील ग्रामीण रुग्णालयात ३० बेडची क्षमता आहे. जिल्हा रुग्णालय ते तालुका रुग्णालय हे अंतर जास्त असल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नव्हते. प्रसंगी रुग्ण दगावण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येथे उपजिल्हा रुग्णालय व्हावे, ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती.
आमदार रोहित पवार यांनी वरील सर्व बाबींचा विचार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची भेट घेऊन सद्यस्थिती मांडली. तसेच पत्र देऊन पाठपुरावा केला. पवार यांनी आरोग्य विभागाला ३ मार्च रोजी दिलेल्या पत्रावरून येथील ग्रामीण रुग्णालयाची जागा
श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मंजुरी दिली आहे. तसेच त्या पद्धतीने जागा अधिग्रहित करून बांधकाम व पदनिर्मिती करणे, स्वतंत्रपणे कार्यवाही करण्यात येईल, अशा आशयाचे पत्र आरोग्य विभागाने बुधवारी दिले आहे.