मिरजगाव आणि खर्डा येथे मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या दोन ठिकाणी पोलीस ठाणे व्हावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी केली होती. तसेच याबाबतचा प्रस्तावही जिल्हा पोलीस प्रशासनाने गृह विभागाकडे पाठविला होता. गेल्या १० ते १५ वर्षांपासून या दोन्हीसह जिल्ह्यातील सात ते आठ ठिकाणी पोलीस ठाणे व्हावेत, अशा मागण्या स्थानिकांनी केलेल्या होत्या. तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते, प्रा. राम शिंदे यांनी व सध्या आमदार रोहित पवार यांनी या ठाण्यांसाठी पाठपुरावा केला होता. गृह विभागाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कर्जत पोलीस ठाण्याचे विभाजन करून मिरजगाव येथे व जामखेड पोलीस ठाण्याचे विभाजन करून खर्डा पोलीस ठाण्याची निर्मिती करण्यात आली आहे. दोन्ही ठाण्यासाठी सध्याच्या आस्थापनेवरील प्रत्येकी ३५ जणांचे मनुष्यबळ उपलब्ध करून द्यायचे आहे.
--
गुन्हेगारी वाढल्याने झाले ठाणे
मिरजगाव हे सोलापूर महामार्गावरचे गाव असून तेथे रस्त्यावरील लुटमार, चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. प्रा. राम शिंदे, बबनराव पाचपुते पालकमंत्री असताना राशिन व मिरजगावच्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याची पूर्वी केली होती. तर खर्डा परिसरात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणावर आहे. एका पोलीस अधिकाऱ्याचा खून, नितीन आगे खून प्रकरणासह विविध प्रकारातील गुन्हेगारीची खर्डा येथे पार्श्वभूमी आहे. इथे पोलीस ठाण्याची मागणी तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्याकडे पहिल्यांदा ग्रामस्थांनी केली होती. क्राईम रेट जास्त असेल तरच पोलीस ठाणे मंजूर होते, या तत्कालीन पालकमंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्यानेही जिल्ह्यात खळबळ माजली होती.
--
असे असेल मनुष्यबळ (प्रत्येकी)
सहायक पोलीस निरीक्षक- ०१
पोलीस उपनिरीक्षक-०१
सहायक पोलीस उपनिरीक्षक-०३
पोलीस हवालदार-०६
पोलीस नाईक-०९
पोलीस शिपाई-१५
एकूण-३५