श्रीगोंदा : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या श्रीगोंदा येथील संत शेख महंमद महाराज मंदिरात गुढीपाडव्याच्या निमित्ताने चंदन लेप व नैवेद्याचा कार्यक्रम असतो. मात्र कोरोना संचारबंदी लागू असल्याने संत शेख महंमद महाराजाचे मंदिर बंद राहिले. चारशे वर्षाच्या कालखंडात मंदिरात प्रथमच गुढीपाडवा उत्सव साजरा झाला नाही.संत शेख महंमद महाराज हे छत्रपती शहाजी राजे यांचे वडील मालोजीराजे भोसले यांचे गुरु होते. मालोजीराजेंनी संत शेख महंमद महाराजांना श्रीगोंदा येथे मठासाठी जागा जमीन दान दिली होती. संत शेख महंमद यांचे देहावसान झाले. तेव्हापासून श्रीगोंद्यातील सर्वधर्मीय एकत्र येऊन संत शेख महंमद महाराज मंदिरात धार्मिक अध्यात्मिक कार्यक्रम साजरा करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी तेली समाजाला चंदन लेपाचा मान असतो. पाच जण चादर चढवितात. त्यानंतर हिंदू नववर्षाची सुरुवात म्हणून नैवेद्य दाखविला जातो भाविक दिवसभर दर्शन घेतात. कोरानामुळे गेल्या पाच सहा दिवसापासून देशातील मंदिर मज्जीद बंद आहेत. या पार्श्वभूमीवर संत शेख महंमद महाराज यांचे मंदिर ही बंद ठेवण्यात आले आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी चार नागरिक मंदिरात गेले. त्यांनी चंदन लेप केला चादर चढविली आणि पुन्हा मंदिर बंद करून घेतले. भक्त मंदिराकडे फिरकले नाही. त्यांनी घरुनच संत शेख महंमद महाराजांचे दर्शन घेतले. कोरोनाची महामारी संकट लवकर जावो आणि तुमच्या मंदिराचा दरवाजा लवकर उघडा होवो अशी प्रार्थना केली. कोरोनामुळे मंदिर मज्जीद बंद आहेत. त्यामुळे संत शेख महंमद महाराजांचे मंदिर बंद आहे. त्यामुळे गुढी पाडव्याच्या उत्सव चारशे वर्षाच्या कालखंडात प्रथमच साजरा करता आला नाही, असे यात्रा कमिटीचे सदस्य अशोक आळेकर, ट्रस्टचे अमिन शेख यांनी सांगितले.
संत शेख महमंद महाराज मंदिर बंद; चारशे वर्षात प्रथमच गुढीपाडवा उत्सव नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 15:35 IST