जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण उपचार घेणारे व विनामूल्य उपचार करणारे रुग्णालय अशी साईबाबा रुग्णालयाची ख्याती आहे.
जिल्ह्यात रेमडेसिविर वितरणात शिर्डीच्या कोविड रुग्णालयाला, तसेच राहात्यावर वारंवार अन्याय होत असल्याची येथील नागरिकांची भावना आहे. २२ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या यादीत शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयाला केवळ तीन रेमडेसिविर तर खासगीसह एकूण अकरा इंजेक्शन मिळाले. यादीनुसार आज नगरला साडेसहाशेपेक्षा अधिक तर संगमनेरला जवळपास ११६, श्रीरामपूर- ६३, पारनेर- ३३, राहुरी-१०, कोपरगाव-२३, अकोले-८, जामखेड-६, पाथर्डी-४, शेवगाव-५, श्रीगोंदा-९ असे इंजेक्शनचे वाटप करण्यात आले.
शिर्डीसाठी देण्यात आलेले इंजेक्शन कोपरगाव येथील एका एजन्सीच्या नावावर आले. मात्र, साईबाबा रुग्णालयासाठी संस्थानमधील मेडिकलच्या माध्यमातून संबंधित एजन्सीकडे विचारणा करता, इंजेक्शन मिळाले नसल्याचे सांगण्यात आले. यादीत नाव आहे, तर इंजेक्शन गेले कुठे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
............
यादीत नाव बघून रुग्णांच्या नातेवाइकांनी आलेले इंजेक्शन कुठे आहेत, याबाबत वारंवार विचारणा करून रुग्णालय प्रशासनाला दिवसभर हैराण केले.
- डॉ.प्रीतम वडगावे, वैद्यकीय संचालक, साईबाबा रुग्णालय
...............
आम्ही यादीनुसार कोपरगावच्या एजन्सीकडे तीन इंजेक्शनची मागणी केली. मात्र, त्यांनी इंजेक्शन त्यांच्याकडे आलेच नसल्याचे कळविले आहे.
-राहुल वर्मा, मित्रसेन मेडिकल, साईबाबा रुग्णालय
..........
इंजेक्शन वितरणाच्या यादीनुसार संबंधित एजन्सीला इंजेक्शन मिळाले असतील व त्यांनी ते साईबाबा रुग्णालयाला दिले नसतील, तर खात्री करून त्या एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात येईल.
- कुंदन हिरे, तहसीलदार