गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटाखाली शिर्डी आणि परिसर सापडला आहे. साईबाबा मंदिरावरच शिर्डीची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी राज्य सरकारच्या आदेशाने साई मंदिर दीड वर्षापासून भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने शिर्डीसह परिसरातील अर्थकारण पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. शिर्डीतील लहान-मोठे व्यवसाय अडचणीत आले आहेत. भाविक नाहीत तर व्यवसाय कसा करायचा, हा प्रश्न सर्वसामान्य व्यावसायिकांपुढे निर्माण झाला आहे. बँकांचे कर्ज थकल्याने वसुलीसाठी त्यांचाही ससेमिरा पाठीशी लागला आहे. या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी काही तरी धोरणात्मक निर्णय होण्याच्या प्रतीक्षेत पालक आहेत.
मंदिर बंद असल्याने शिर्डी आणि परिसरात ओढवलेल्या आर्थिक संकटात सर्वसामान्यांना मदतीचा हात देण्यासाठी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी साईबाबा संस्थानच्या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांचे शैक्षणिक शुल्क माफ होणे गरजेचे आहे. यासाठी आपण साई संस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांना भेटून यासंबंधीचा निर्णय घेण्यासाठी विनंती करणार असल्याचे कोते यांनी सांगितले.