संगमनेर : काही अभ्यासक संत साहित्याला कालबाह्य ठरवून सुधारणावादाच्या कक्षेतून बाद करू पाहत आहे, हे योग्य नाही, असे परखड मत पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या नियोजित ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. संगमनेर महाविद्यालयात गुरूवारी ‘संत साहित्याचे समाज प्रबोधनातील योगदान’ या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्रास प्रारंभ झाला. चर्चासत्राचे उद्घाटन मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष व संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ.सबनीस होते. संत साहित्य केवळ अध्यात्मिक साहित्य म्हणण्याचा प्रघात पडत चालला आहे. वास्तविक भौतिकवाद आणि प्रापंचिकतेसाठी संत साहित्य उपयुक्त आहे. संताची अध्यात्मिक व सामाजिक समता ही वैश्विक आहे. सामाजिक समतेसाठी संत साहित्य पूरक आहे. संत तुकारामांची समता आधुनिक समतेला पूरक असल्याचे सांगत डॉ.सबनीस यांनी तुकारामांच्या काही वचनांची उदाहरणे दिली. संत साहित्य श्रध्देचे साहित्य जरूर आहे. माणसातील विकृती दूर करण्यासाठी आणि निखळ माणूस बनण्यासाठी संत साहित्य गरजेचे आहे. संत साहित्य व समाज सुधारकांची परंपरा या दोन्हीमध्ये समतेचे सूत्र आहे. हे दोन्ही प्रवाह वेगळे नाहीत. या प्रवाहांना जोडण्यासाठी समतावादी संचित जरूरीचे आहे. त्यामुळे विद्वानांची विभागणी दोन टोकांच्या वर्तुळात नको. यावेळी कार्याध्यक्ष डॉ.संजय मालपाणी, प्राचार्य डॉ.के.के.देशमुख यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्तविक समन्वयक प्रा.डॉ.अशोक लिंबेकर यांनी केले. सूत्रसंचलन प्रा.डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले तर आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. रघुनाथ खरात यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)
संत साहित्याला बाद करण्याचा डाव
By admin | Updated: December 17, 2015 23:37 IST