तिसगाव : ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या बुधवारच्या अखेरच्या टप्प्यात इच्छुकांची चांगलीच धावपळ उडाली. तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने ऐंशी टक्के तालुका निवडणूकमय झाला आहे.
प्रमुख गावांच्या मोठ्या रस्त्यालगतचे हॉटेल्स, धाबे, नाश्ता केंद्रे गर्दीने ओसंडून वाहत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जाते. त्यामुळे ग्रामीण सत्ताकेंद्रे ताब्यात ठेवण्यासाठी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीसह मनसेच्या स्थानिक पदाधिकारी पडद्याआडून सूत्रे हलवीत असल्याचे चित्र आहे. शिरसाठवाडी, शिरापूरमध्ये पूर्ण उमेदवारांचे मंडळ तर मढी, घाटशिरस, राघुहिवरे येथे काही जागांवर मनसेने उमेदवार उभे केले असल्याचे राज्य उपाध्यक्ष संजय पाखरे यांनी सांगितले. धामणगाव देवीचे येथे तिरंगी शक्यता निर्माण इतक्या पटीने उमेदवारी अर्ज दाखल झाले. सत्ताधारी गटाची कोंडी करण्यात तरुणाईला बऱ्याच अंशी येथे यश मिळाले.