विसापूर : पिंपळगाव पिसा (ता.श्रीगोंदा) प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोरोना चाचणीचे आरटीपीसीआर अहवाल दहा दिवसांनंतरही मिळत नसल्याच्या तक्रारी काही नागरिकांनी केल्या आहेत. काही नागरिकांना याबाबत जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून मोबाइलवर मेसेजही आले; मात्र अहवाल मिळालेेले नाहीत.
सध्या आरोग्य यंत्रणेने कोरोना तपासणीचा वेग वाढविला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत दररोज किमान ७५ आरटीपीसीआर चाचण्या घेण्याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पिंपळगाव पिसा (ता.श्रीगोंदा) प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने कोरोना तपासणीसाठी (आरटीपीसीआर) लोकांच्या घशातील स्राव घेऊन जिल्हा रुग्णालयात पाठविलेले आहेत. विसापूर भागातील काही नागरिकांचे २२ मे रोजी स्राव घेण्यात आले. २३ मे रोजी स्राव तपासणीसाठी मिळाल्याचे मोबाइलवर मेसेज संबंधित लोकांना आरोग्य यंत्रणेने पाठविले आहेत. दहा दिवस उलटले तरीही या लोकांना ते पॉझिटिव्ह आहेत की निगेटिव्ह, याबाबत अहवाल प्राप्त झालेले नाहीत.
स्त्राव देऊन आरटीपीसीआर टेस्टचे अहवाल दहा दिवसांत लोकांना मिळणार नसतील तर या टेस्ट घेण्याचा फार्स कशासाठी केला जात आहे, याबाबत लोकांकडून आरोग्य यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या तपासणी अहवालाबाबत प्राथमिक आरोग्य केंद्रात चौकशी केली असता, त्यांनी एकत्रीत केलेले सर्व स्राव जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात येतात, असे सांगण्यात आले.
----
आरटीपीसीआर चाचणीचे अहवाल सध्या जलद गतीने म्हणजे दोन दिवसात येतात; मात्र काही लोकांना त्या अहवालाचा मोबाइलवर मेसेज येण्यास काही तांत्रिक अडचणी येत असतील. आरटीपीसीआर तपासणी करून लवकर मेसेज न आल्यास अशा लोकांनी आरोग्य विभागाशी संपर्क साधावा.
-नितीन खामकर,
तालुका आरोग्य अधिकारी, श्रीगोंदा.