आॅनलाईन लोकमतकोपरगाव (अहमदनगर), दि़ 5 - नगरपालिका आरोग्य विभागाने जंतूनाशक पावडरमध्ये चक्क रांगोळी मिसळल्याचे खुद्द नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी निदर्शनास आणत ८६ गोण्यांच्या साठ्याला सील ठोकले. या प्रकारामुळे पालिकेतील भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. शहरातील गटारी, मुताऱ्या, स्वछतागृहे, रस्ते, कचराकुंड्या, नाले, सांडपाणी, पाण्याचे डबके आदींपासून जंतूंचा प्रादूर्भाव होवू नये म्हणून पालिकेच्या वतीने ‘कार्बोलीक पावडर’ टाकली जाते. दरम्यान आरोग्य विभागाने शहरात जंतूनाशक पावडर टाकण्यास सुरूवात केली असता, तिचा वास येत नसल्याचे काही नागरीकांनी नगराध्यक्ष वहाडणे यांना कळविले. त्यानुसार वहाडणे यांनी स्वत: आरोग्य विभागाच्या गोदामात जावून खात्री केली असता ‘कार्बोलीक पावडर’ ऐवजी चक्क रांगोळी भरलेल्या ८६ गोण्या आढळून आल्या. त्यांनी नगरसेवक स्वप्नील निखाडे, कैलास जाधव, राजेंद्र सोनवणे, स्वछता निरीक्षक सुनिल आरण यांच्या समक्ष निकृष्ट पॉवडरच्या ८६ गोण्यांचा पंचनामा करून गोदामास सील ठोकले. सदर गोण्या जप्त करून शहर पोलीसांना कळविण्यात आले आहे. या प्रकाराने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. नगरपालिकेने २०१६ मध्ये सुदर्शन फार्मा इंडस्ट्रीज(भिवंडी) या कंपनीला ‘कार्बोलीक पावडर’ पुरविण्याचा वार्षीक ठेका दिला होता. त्यानुसार पालिकेने पावडर मागविली होती. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटून तक्रार करणार आहे, असे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सांगितले़
जंतूनाशक पावडरऐवजी पालिकेला विकल्या रांगोळीने भरलेल्या गोण्या
By admin | Updated: April 5, 2017 15:16 IST