अहमदनगर : नगरमधील पतसंस्थांना गेल्या ११ वर्षांपासून स्थैर्य देणाऱ्या स्थैर्यनिधी सहकारी संघाचे काम प्रामाणिकपणे चालू आहे. पतसंस्थांच्या ठेवींवर राज्यातील सर्वात जास्त व्याज स्थैर्यनिधी संघ देत आहे. पतसंस्था चळवळीत संकट मोचकची भूमिका निभावणाऱ्या स्थैर्यनिधी संघाची संकल्पना संपूर्ण राज्यभर राबवावी, असा ठराव फेडरेशनने करून सहकार खात्याकडे दाखल केला आहे. चांगल्या ठिकाणी गुंतवणुकीसाठी चांगले नवे मार्ग शोधण्यासाठी स्थैर्यनिधी संघाने मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांनी केले.
अहमदनगर जिल्हा पतसंस्था स्थैर्यनिधी सहकारी संघाची २०१९-२० वर्षाची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी राहुरी येथे झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे होते. यावेळी संघाचे मुख्य प्रवर्तक काका कोयटे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपाध्यक्ष वसंत लोढा, शिवाजी कपाळे व्यासपीठावर उपस्थित होते. सभेला संचालक रवी बोरावके, पुखराज पिपाडा, विठ्ठलराव अभंग, बाळासाहेब उंडे, उमेश मोरगावकर, सुशीला नवले, आर. डी. मंत्री, अजिनाथ हजारे आदी उपस्थित होते. या बैठकीत विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.
वसंत लोढा म्हणाले, स्थैर्यनिधी संघामार्फत जिल्ह्यामध्ये कर्ज वसुलीचे चांगले काम सुरु आहे. थकीत कर्ज वसुलीच्या माध्यमातून अडचणीत आलेल्या पतसंस्थांना बाहेर काढत आहे. राज्य पतसंस्था फेडरेशनच्या मार्गदर्शनाखाली काम करत स्थैर्यनिधी संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पतसंस्थांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षणही देत आहोत.
या बैठकीचे सूत्रसंचालन शिवाजी कपाळे यांनी केले. रवी बोरावके यांनी नफा वाटणी घोषित केली. संघाचे व्यवस्थापक महेश जाधव यांनी इतिवृत्ताचे वाचन केले. अजिनाथ हजारे यांनी आभार मानले.
...
जिल्हा बँकेने जादा व्याज द्यावे
स्थैर्यनिधीमार्फत पतसंस्थांचे थकीत कर्ज प्रकरणे वसूल करण्याचे काम कोरोनाच्या आलेल्या संकटामुळे थांबले होते. आता हे काम पुन्हा सुरु झाले आहे. जिल्हा बँकेने पतसंस्थांच्या ठेवींना अधिक व्याज द्यावे, ही मागणी लवकरात लवकर मान्य व्हावी यासाठी स्थैर्यनिधी पाठपुरावा करत आहे. चांगले काम झाल्याने स्थैर्यनिधी संघाच्या सभासद, ठेवी व नफ्यातही वाढ झाली आहे, असे संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले.