लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : कोपरगाव - श्रीरामपूर या राज्य मार्गावरून समृद्धी महामार्गाच्या भरावासाठी डंपरमधून मातीची वाहतूक होत आहे. या वाहतुकीदरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती सांडत आहे. या मातीचे धुळीत रुपांतर होत आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांच्या नाकातोंडात व डोळ्यात धूळ जात आहे. तर अंगावरील कपडेदेखील धुळीने माखत असून प्रवाशांना याचा गंभीर त्रास होत आहे. मात्र, याकडे मातीची वाहतूक करणाऱ्या ठेकेदार कंपनीकडून दुर्लक्ष होत आहे.
कोपरगाव तालुक्यातील दहा गावात समृद्धी महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या कामाच्या भरावासाठी डंपरच्या साह्याने मातीची वाहतूक सुरू आहे. सध्या कोपरगाव - श्रीरामपूर या राज्य मार्गावरून ही वाहतूक सुरू आहे. वाहतुकीदरम्यान डंपरमधून सांडणारी माती रस्त्यावर पडत आहे. त्यातून रस्त्यावर धुळीचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्यावरून दररोज हजारोंच्या संख्येने दुचाकीवरून प्रवास करणारे प्रवासी आहेत. दिवसा तसेच रात्री या रस्त्यावर धूळ असल्याने वाहनचालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे धुळीचा बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करून प्रवाशांना या रोजच्याच जीवघेण्या प्रवासातून दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
................
कोपरगाव - श्रीरामपूर या राज्यमार्गावरून दररोज नोकरीनिमित्त प्रवास करतो. या रस्त्यावर सांडलेल्या मातीच्या धुळीमुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे.
- रवींद्र जाधव, प्रवासी, कोपरगाव
.....................
फोटो०१ - समृद्धी महामार्गामुळे रस्त्यावर धूळ, कोपरगाव