कर्जत/श्रीगोंदा : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाइं) च्यावतीने कर्जत व श्रीगोंदा शहरात तहसील कार्यालयावर गुरुवारी सकाळी मोर्चा काढण्यात आला. यावेळी शासकीय नोकरीतील मागासवर्गीयांचे पदोन्नतीमधील आरक्षण रद्द केल्याबद्दल राज्य शासनाचा निषेध नोंदविण्यात आला.
कर्जत येथील मोर्चाची सुरुवात आक्काबाई नगर येथून झाली. मुख्य रस्त्याने राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले.
राज्य शासनाने मागासवर्गीय समाजाच्या पदोन्नतीमधील आरक्षण हटविण्याचा नुकताच निर्णय घेतला आहे. हा निर्णय चुकीचा आहे. महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय रद्द करून पुन्हा आरक्षण द्यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
यावेळी तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ताजी कदम, जिल्हा युवक उपाध्यक्ष विशाल काकडे, युवक शहराध्यक्ष सागर कांबळे, तालुका उपाध्यक्ष शहाजी साळवे, राशिन शहराध्यक्ष शरद आढाव, विद्यार्थी संघटना अध्यक्ष अक्षय भैलुमे, मिरजगाव शहराध्यक्ष नागेश घोडके, सचिन कांबळे, सरपंच बापू साळवे, बबन भैलुमे, किरण भैलुमे, हामजत शेख, लक्ष्मण अवचर, अनिल गंगावणे, नितीन भैलुमे, संतोष आखाडे आदी उपस्थित होते.
श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोरही रिपाइंच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तहसीलदार प्रदीप पवार व पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना निवेदन देण्यात आले. रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, तालुकाध्यक्ष राजाभाऊ जगताप यांनी यावेळी राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीय समाजाचा संवैधानिक अधिकार आहे. राज्य सरकारने पदोन्नतीमध्ये मागासवर्गीय आरक्षणाचा त्वरित निर्णय घ्यावा. याची चालढकल करू नये. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नतीमध्ये मागासवर्गीयांना आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा निर्णय त्वरित घ्यावा, अन्यथा रिपाइं पक्ष आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी शेखर घोडके, विकास घोडके, योगेश घोडके, आनंद घोडके, अमोल ढवळे, रणजित मखरे, तृषाल ससाणे, तुषार जगताप, भूषण घाडगे, मयूर घोडके, शुभम घोडके आदी उपस्थित होते.
---
फोटो दोन आहेत.
०३ कर्जत आरपीआय
कर्जत शहरातील मोर्चामध्ये रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी केली.
०३ श्रीगोंदा आरपीआय
श्रीगोंदा येथे तहसीलदारांना निवेदन देताना रिपाइंचे कार्यकर्ते.