कोपरगाव : महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनला महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा १९६० अधिनियम ६१ मधील कलम १०१ अन्वये थकबाकी वसुलीसाठी वसुली दाखला देण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत. वसुली दाखला देण्यासाठी राज्य फेडरेशनचे आस्थापनेवर परसेवा अधिकारी म्हणून प्रदीप कारभारी सानप या सहाय्यक निबंधक दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी दिली.
सानप हे गेल्या २५ वर्षे सहकार खात्यात विविध पदांवर काम केलेले अधिकारी आहेत. ते प्रत्येक सोमवारी अहमदनगर येथे अहमदनगर जिल्हा सहकारी पतसंस्था स्थैर्यनिधीचे साक्षी चेंबर, कोर्ट गल्ली, अहमदनगर येथील कार्यालयात तसेच प्रत्येक गुरुवारी नाशिक येथील कल्याणी महिला नागरी सहकारी पतसंस्था येथे उपलब्ध असतील. कामाच्या व्याप्तीनुसार अहमदनगर व नाशिक येथे आणखी २ ते ३ दिवस कालावधी वाढविण्यात येणार आहे. पुणे जिल्ह्यासाठी हे अधिकारी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या सीटीसी क्र.११९ / बी, तिसरा मजला, प्रमिला अपार्टमेंट, लकाकी बंगलो शेजारी, लकाकी रोड मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे येथील कार्यालयात इतर दिवशी उपलब्ध असणार आहेत. महाराष्ट्रातील कोणत्याही गावातील सहकारी पतसंस्थांना या सेवाचा लाभ घेता येणार आहे. सानप यांना संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षेत्र मिळाले असल्याने तसेच ही सेवा ऑनलाईन देखील उपलब्ध होणार असल्याने महाराष्ट्रातील सर्व पतसंस्थांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.
------
महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचा थकबाकी वसुलीचा कायदा गतिमान होण्यासाठी गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे. दाखला देण्याचे प्रक्रियेसाठी सहा महिने ते एका वर्षाचा कालवधी लागत होता. हा कालावधी आता राज्य फेडरेशनच्या प्रयत्नाने कमी होणार आहे. कमीत कमी ३० तर जास्तीत जास्त ६० दिवस या कालावधीत हा दाखला देण्यात येणार आहे.
सुरेखा लवांडे, सरव्यवस्थापिका, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन