हरेगाव : मंगळवारी गणेश विसर्जनाची लगबग सुरु असतानाच सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली़ सीताराम रामकिसन उंडे (वय ६०, रा़ मातापूर) असे मयत मुख्याध्यापकाचे नाव असून ते अकोले तालुक्यातील कोतूळ येथील एका शैक्षणिक संस्थेतून दोन वर्षांपूर्वीच सेवानिवृत्त झाले होते.श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव हद्दीतील एकवाडी शिवारात मंगळवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास शेती महामंडळाच्या जमिनीत उंडे यांचा मृतदेह स्थानिकांना आढळून आला़ मयताच्या शेजारीच विषारी द्रव्याची एक रिकामी बाटली होती़ त्यामुळे विष प्राशन करुन उंडे यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शन नागरिकांच्या लक्षात आले़ त्यांनी पोलिसांना फोनवरुन ही माहिती दिली़ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी रुग्णवाहिका पाठविली़ रुग्णवाहिका येईपर्यंत उंडे यांच्या तोंडातून फेस येऊ लागला होता़ या रुग्णवाहिकेतून स्थानिकांनी उंडे यांना श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले़ दवाखान्यात तपासणी करून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गाडे यांनी उंडे मृत झाल्याचे घोषित केले़ हरेगाव पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल भैलुमे यांनी तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली़ मात्र, मृतदेहाची ओळख पटत नव्हती़ त्यामुळे भैलुमे यांनी तेथे पडलेल्या दुचाकीची (क्रमांक एम.एच.१७ ए.बी.५१५८) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून माहिती घेतली़ ही दुचाकी मातापूर येथील रहिवाशी केदारनाथ उंडे यांच्या नावे नोंद होती़ त्यानुसार वेगाने तपासाची चक्रे फिरवत पोलिसांनी शोध घेतला असता मयत इसमाचे नाव सीताराम रामकिसन उंडे असल्याचे निष्पन्न झाले़ मयताच्या नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह ताब्यात घेतला. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़ पुढील तपास पोलीस निरीक्षक पथवे यांच्या मार्गदर्शनाखाली हरेगाव पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल एन. के. भैलुमे हे करीत आहेत.
हरेगाव येथे निवृत्त मुख्याध्यापकाची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 14:26 IST