राहाता (अहमदनगर): सामाजिक संदेश देणारा चित्रपट पाहण्याची आयडिया जिल्हा परीषदेच्या अध्यक्षांना सूचली. त्यांनी ही आयडिया सदस्यांसह इतरांना बोलून दाखविली. त्यास सर्वांनी सहमती दाखवत थेट थिएटर गाठत पाहिला टॉयलेट एक प्रेमकथा हा हिंदी सिनेमा. चित्रपट पाहिल्यानंतर जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचा संकल्पही यावेळी सर्वांनी केला. ही घटना आहे अहमदनगर जिल्ह्यातील.
अहमदनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे यांनी सामाजिक संदेश देणारा टॉयलेट एक प्रेमकथा हा हिंदी चित्रपट पाहण्याचा विचार सदस्यांसमोर मांडला. हा विचार सर्वांना पटला. त्यामुुळे विखे यांच्यासह राहाता तालुक्यातील पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्यांनी लोणीमधील थिएटर गाठले. चित्रपट पाहत सामाजिक संदेशही घेतला. चित्रपट सर्व सदस्यांनी एकत्रित पाहील्यानंतर समाधान व्यक्त केले.
अध्यक्षा शालिनीताई विखे म्हणाल्या, अहमदनगर जिल्हा हागणदारी मुक्त होण्याच्या दृष्टीने आता वाटचाल करीत आहे. या पाशर््वभूमिवर टॉयलेट एक प्रेमकथा हा चित्रपट हा आमच्या सर्वांच्या दृष्टीने प्रेरणादायी असा आहे. हा चित्रपट शालेय विद्याथर््यांबरोबरच युवकांनीही आवर्जून पाहीला तर हागणदारीमुक्त गाव योजनेला निश्चितच चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया विखे यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी राहाता पंचायत समितीच्या सभापती हिराबाई कातोरे, उपसभापती बाबासाहेब म्हस्के यांच्यासह सर्व जिल्हा परिषद,पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरंपच, ग्रामसेवक हा चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होते.
श्रीनारायण सिंग यांनी दिग्दर्शित केलेल्या टॉयलेट एक प्रेमकथेमध्ये अक्षय कुमार आणि भूमी पेढणेकर यांची प्रमुख भूमिका आहे. सामाजिक आशय असलेल्या चित्रपटाच्या माध्यमातून वास्तव परिस्थितीची जाणीव करुन देण्यात आली आहे. हागणदारी मुक्त गावाबरोबरच शौचालयाचे महत्व विषद करण्यात आले आहे.