अहमदनगर: पुणे येथील मोहसीन शेख हत्येचा निषेध करीत हिंदुराष्ट्र सेनेवर बंदी घालावी, असा ठराव राज्यव्यापी धिक्कार परिषदेत सोमवारी करण्यात आला़ जातीयवाद्यांचे आक्रमण रोखण्यासाठी दलितांनी वैचारिकदृष्ट्या सक्षम होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले़नगर येथे राज्यव्यापी अत्याचारविरोधी धिक्कार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते़ कॉ़ गोविंद पानसरे, प्रकाश आंबेडकर, मुक्ता मनोहर, झहीर अली, अरुण जाधव, कॉ़बाबा आरगडे, कॉ़ अनंत लोखंडे आदी परिषदेस उपस्थित होेते़ परिषदेत दलित, मुस्लीम समाजावरील अत्याचारविरोधात वैचारिक लढा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यावेळी अत्याचाराच्याविरोधात वैचारिक लढा उभारण्याची हाक पानसरे यांनी दिली़ पानसरे म्हणाले, जातीयवाद्यांनी क्रिया करायची आणि त्यावर आपण प्रक्रिया द्यायची, हे आता थांबले पाहिजे़ सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज असल्याचे पानसरे यावेळी म्हणाले़ दलित व मुस्लीम समाजातील युवक सैरभैर झाले आहेत़ येणाऱ्या पिढीचा विचार आपण केला पाहिजे़ आता रडायचे थांबवा आणि अत्याचारास जशास तसे उत्तर द्या, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी केले़ मुस्लिमांवरील अत्याचार वाढत आहेत़ हे एक संकट आहे़ या संकटाविरोधात एकट्याने लढून फायदा नाही, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे झहीर अली यावेळी म्हणाले़ पुणे येथील घटनेचा निषेध करत हिंदुराष्ट्रसेनेवर बंदी घालण्याचा ठराव परिषदेत करण्यात आला़ (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदेंच्या निषेधाचा ठरावजिल्ह्यातील अत्याचारविरोधी घटनांचा तपास लावा,अशी मागणी करण्यासाठी कार्यकर्ते जिल्हा पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्याकडे गेले असता टाळी एका हाताने वाजत नाही, असे शिंदे म्हणाले होते़ त्यांच्या या विधानाचा निषेध करत त्यांच्या निषेधाचा ठराव परिषदेत करण्यात आला़अॅड़ निकम यांच्या नेमणुकीस विरोधराज्यातील अत्याचारविरोधी घटनांच्या खटल्यात अॅड़ उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात आली़ मात्र त्यांनी एकाही घटनेचा निकाल लावला नसल्याने त्यांची यापुढील घटनेत नेमणूक करू नये,असा ठराव यावेळी करण्यात आला़जातीय अत्याचारविरोधी संघर्ष समिती स्थापनदलितांवर होणाऱ्या अत्याचारांच्याविरोधात लढा उभारण्यासाठी जातीय अत्याचारविरोधी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली आहे़ समितीच्या अध्यक्षपदी कॉ़ बाबा आरगडे, कार्याध्यक्षपदी अॅड़ अरुण जाधव, सचिवपदी कॉ़ अनंत लोखंडे आणि उपाध्यक्षपदी एऩएम़ पवळे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे लोखंडे यांनी सांगितले़
हिंदुराष्ट्र सेनेवर बंदीचा ठराव
By admin | Updated: June 17, 2014 00:35 IST