राहुरी : मुळा नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याची खबर मिळताच छापा टाकण्यासाठी निघालेल्या महसूल पथकावर रविवारी रात्री वाळूतस्करांनी गलोलीने हल्ला केला. त्यात कामगार तलाठी जखमी झाले असून त्यांना अहमदनगर येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले़ दरम्यान, महसूल कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध म्हणून सोमवारी काम बंद आंदोलन केले. रविवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मंडल अधिकारी बी़ जी़ सोडणर, कामगार तलाठी शिवाजी टेमकर व हरिभाऊ मुठे यांना मुळा नदीपात्रात वाळू चोरी होत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार हे पथक देसवंडीमार्गे जात होते. पथक आल्याची माहिती मिळाल्याने राजेश्वर मंदिराच्या लगत असलेल्या झाडीत चौघे वाळूतस्कर दडून बसले होते. त्यांनी गलोलीने पथकावर हल्ला चढविला़ हल्ल्यात कामगार तलाठी हरिभाऊ मुठे हे गंभीर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी राहुरी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले़ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर मुठे यांना अहमदनगर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले़ सोमवारी सायंकाळी अज्ञात व्यक्तीविरूध्द राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला़ (तालुका प्रतिनिधी)
वाळूतस्करांचा महसूल पथकावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 23:25 IST