कोपरगाव : विधानसभा अधिवेशनात कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडू नका, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश असतानाही कोपरगाव मतदारसंघात अनेक ठिकाणी वीजवितरण कर्मचारी हे शेतकरी बांधवांची पिळवणूक करत असल्याचे निदर्शनास येत आहे. वीज तोडणी तत्काळ थांबविली नाही, तर याद राखा, असा इशारा जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी महावितरण कंपनीला दिला आहे.
कोल्हे म्हणाले, महावितरण कंपनी शेतकऱ्यांची वीज देयके थकीत आहेत. त्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वीज कनेक्शन तोडणीसंदर्भात विधानसभेत सरकारला धारेवर धरले. वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवा, अशी भूमिका घेत शासनाला कोंडीत पकडून अखेर निर्णय घेण्यास भाग पाडले. यापूर्वी ज्या शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडले आहे. त्यांचेही पूर्ववत करा, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली. मात्र, शासन निर्णयानंतरही जो पर्यंत वीजबिल भरले जाणार नाही. तोपर्यंत वीज कनेक्शन जोडले जाणार नाही, अशी भूमिका वीज वितरण कंपनी बऱ्याच ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची फार मोठी हेळसांड होत असून एका बाजूला शासनाने घेतलेल्या भूमिकेला महावितरण कंपनीकडून आदेशाची अमलबजावणी होत नाही. याची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच शासनाच्या आदेशांना केराची टोपली, दाखवणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी. तसेच कुणाचेही वीज कनेक्शन तोडले जाणार नाही. याची दखल घ्यावी, अन्यथा शेतकरी बांधवांसाठी आक्रमक पवित्रा घेऊ.