पक्षाचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, कामगार आघाडीचे राजेंद्र चव्हाण, नगरसेवक किरण लुणिया, संजय पांडे, अभिजित कुलकर्णी यांनी प्रांताधिकारी अनिल पवार यांची रविवारी भेट घेतली. यावेळी शहरातील रुग्णांच्या हिताकरिता काही ठोस उपाययोजना प्रांताधिकाऱ्यांना सुचविण्यात आल्या.
कोरोना रुग्णांच्या कुटुंबीयांना रेमडेसिविरच्या उपलब्धतेची कुठेही माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांना शोधाशोध करावी लागते. चुकीच्या लोकांच्या संपर्कात येऊन आर्थिक लूट होण्याचे प्रकार घडतात. सोशल मीडियातून दररोज माहिती मिळाल्यास रुग्णांना दिलासा मिळेल, अशी मागणी करण्यात आली.
खासगी रुग्णालये रुग्णांना भरती होण्यापूर्वी ५० हजार रुपयांची मागणी करत आहेत. यासंबंधी अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. अचानक उद्भवणाऱ्या या खर्चासाठी कोणाचीही प्राथमिक तयारी नसते. त्यामुळे रुग्णालयांनी दररोज होणाऱ्या खर्चाचा भरणा करून घ्यावा. त्यातून निश्चितच दिलासा मिळेल, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.
राज्य सरकारने कोरोनावरील उपचारांचे दर निश्चित केलेले आहेत. रुग्णालयांना त्याचे पालन करावे लागते. मात्र, रुग्णाच्या कुटुंबीयांना या दरांविषयी कोणतीही माहिती नाही. त्यामुळे रुग्णालयाच्या दर्शनी भागामध्ये हे दरपत्रक लावावे. त्यातून होणारी संभाव्य लूट रोखता येईल, अशी मागणी शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
-----------