औताडे म्हणाले, पाणलोट क्षेत्रात घोटी-इगतपुरी त्र्यंबकेश्वर भागात पर्जन्यमान चांगले झाल्याने गोदावरी नदीला वाहत आहे. दारणा-गंगापूर धरणे ७५ टक्के भरलेली आहेत. कोपरगाव, राहाता तालुका अवर्षणप्रवण क्षेत्रात मोडतो. त्यामुळे ब्रिटिशांनी या भागाला पाणी मिळण्यासाठी या धरणांची निर्मिती करून गोदावरी कालव्याद्वारे पाणी आणले. मात्र, २००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा झाला आणि नगर, नाशिक जिल्ह्याचे हक्काचे पाणी मराठवाड्याकडे वर्ग करण्यात आले. शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडित असलेला गोदावरी कालव्याच्या पाणी प्रश्नावर लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला पाहिजे. धरणात पाणी असूनदेखील कालव्यांना पाणी न सोडता गोदावरीला विसर्ग करावा लागतो. ही अडचण केवळ या कायद्यामुळे झाली आहे. शेतकऱ्याने पदरमोड करीत, दागिने गहाण ठेवत, कर्ज काढून खरिपाची पिके घेतली आहेत. सोयाबीन, मका, कपाशी, भाजीपाला फळबागा पाऊस नसल्याने पाण्याअभावी जळून चालल्या आहेत. सातत्याने शेतकऱ्यांच्या वतीने गोदावरी कालव्यांना आवर्तन सोडण्याची मागणी होत आहे.
गोदावरी कालव्याला तातडीने आवर्तन सोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:25 IST