लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : नवीन टिळक रस्त्याची उंची अनावश्यकपणे वाढविण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागणार असून, टिळक रस्त्याची अनावश्यक उंची कमी करा, असा आदेश आमदार संग्राम जगताप यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना दिला.
शहरातील टिळक रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाची आमदार जगताप यांनी बुधवारी पाहणी केली. यावेळी जगताप यांनी वरील आदेश दिले. जगताप म्हणाले, वाहतूकीच्या दृष्टीने शहरातील हा महत्त्वाचा रस्ता आहे. हा रस्ता नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीतून निधी उपलब्ध करून दिला. यावेळी या मार्गावरील व्यावसायिकांनी रस्त्याची अनावश्यकपणे उंची वाढविण्यात आली आहे, त्यामुळे भविष्यात अनेक समस्या निर्माण होणार असल्याची तक्रार केली. त्याची दखल घेत रस्त्याची वाढविलेली अनावश्यक उंची कमी करून पुन्हा काम करण्याचे आदेश दिले.