नगर जिल्ह्यात १६ जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ झाला. प्रारंभी लसीकरणाचा वेग कमी होता. मात्र, हळूहळू हा वेग वाढवण्यात आला. आता १८ वर्षांपुढील सर्वांचेच लसीकरण करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. ७ सप्टेंबर रोजी ५९ हजार ४१, ८ सप्टेंबर रोजी विक्रमी ८९ हजार २५७, तर ९ सप्टेंबर रोजी ४० हजार ३०३ असे तीन दिवसांत एकूण १ लाख ८८ हजार ६०१ डोस देण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे उत्तम नियोजन सुरू आहे. जेवढे लसीकरण रोज संपेल, त्यापेक्षा जास्त लस दुसऱ्या दिवशी त्या केंद्रांना मिळत आहे. म्हणजे ‘कामगिरी दाखवा व लस मिळवा’ असे हे सूत्र असून त्याप्रमाणात सध्या मुबलक लस उपलब्ध होत आहे.
जिल्ह्यात सध्या ग्रामीण रुग्णालये, महानगरपालिकेची केंद्रे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावागावांत लसीकरणाची शिबिरे आयोजित करून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे.
---------------
३८ लाख ८७ हजार उद्दिष्ट
नगर जिल्ह्यात ३८ लाख ८७ हजार ७६४ जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत १५ लाख २६ हजार २११ जणांना पहिला डोस (३९.२५ टक्के), तर ५ लाख ५७ हजार ७८२ जणांना दुसरा डोस (१४.३४ टक्के) देण्यात आला आहे. असे एकूण २० लाख ८३ हजार ९९३ डोस आतापर्यंत संपले आहेत.
---------------
शनिवारी १ लाखांचे नियोजन
शनिवारी (दि. ११) जिल्ह्यात सर्व केंद्रांवर मिळून सुमारे १ लाख डोसच्या लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. हे लसीकरण दिवसभरात संपले तर तो आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा ठरेल. त्यादृष्टीने सर्व आरोग्य अधिकारी, कर्मचारी नियोजन करत आहेत.