अकोले : तालुक्यातील रेशन धान्य वाटपाच्या सावळ्या गोंधळाबाबत येथील ग्राहक पंचायतीने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देत मोफत ध्यान ग्राहकांना मिळाले नसल्याची तक्रार केली आहे.
दरम्यान, मोफत धान्य वाटप वेळेत व योग्य केले असून, रेशन वितरण व्यवस्था सुरळीत सुरु असल्याचा दावा पुरवठा विभाग प्रशासनाने केला आहे.
राजूर येथे पोलिसांनी चार ट्रक स्वस्त धान्याच्या गाड्या पकडून कारवाई केली. हे धान्य कुठे चालले होते व ते सरकारी गोडावूनमधून कोणाच्या आदेशाने बाहेर पडले? असे प्रकार अकोले तालुक्यात वारंवार होत आहेत. तालुका पुरवठा विभाग व संबंधित अधिकारी यांना अशी गलथान धान्य वितरण व्यवस्था वेळोवेळी निदर्शनास आणून दिली आहे. मात्र, पुरवठा विभागाने अद्याप कोणतीही दखल घेतलेली नाही. धान्य वितरणाबाबत झालेला घोळ तसेच सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर २०२० व २०२१चे मोफत धान्य अद्यापही लोकांना मिळालेले नाही. हे धान्य लोकांना ताबडतोब मिळावे व आदिवासी भागातील लोकांचे धान्य ताबडतोब मिळावे, अशी मागणी ग्राहक पंचायतीचे मच्छींद्र मंडलिक, दत्ता शेणकर, दत्ता रत्नपारखी, रमेश राक्षे यांनी केली आहे.
.......
तालुक्यात मोफत धान्य वाटप वेगळे व योग्य झाले आहे. आदिवासी भागातदेखील सुरळीत रेशन वितरण सुरू आहे. वांजुळशेत, रतनवाडी, अंबित आदी काही ठिकाणच्या रेशनबाबत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यात आले आहे. ग्राहक पंचायतीने आता केलेल्या आरोपात तथ्य नाही.
- मुकेश कांबळे, तहसीलदार, अकोले.