कोपरगाव : तालुक्यातील रांजणगाव देशमुख येथे बुधवार व गुरुवार या दोन दिवसात हिरव्या चाऱ्यातून विषबाधा झाल्याने चार शेतकऱ्यांच्या सहा गायी व एक बैल दगावल्याची घटना घडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
रांजणगाव देशमुख येथील कैलास मुरलीधर गोर्डे या शेतकऱ्याच्या चार गायी दगावल्या आहेत. तर दशरथ साहेबराव खालकर, संपत खालकर यांची प्रत्येकी एक गाय तर अनिल खालकर यांचा एक बैल अशी एकूण सात जनावरे दगावली आहेत.
दरम्यान, रांजणगाव देशमुख येथे नाशिक येथील विभागीय रोग अन्वेषण प्रयोगशाळेचे सहायक आयुक्त डॉ. प्रदीप झोड, डॉ. गिरीश पाटील तसेच नगर येथील जिल्हा पशुचिकित्सालयाचे सहायक आयुक्त डॉ. जालिंदर टिटमे व कोपरगावचे सहायक आयुक्त डॉ. अजयनाथ थोरे यांच्या पथकाने भेट देत पाहणी करून चारा, खाद्य व रक्ताचे नमुने घेऊन तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. त्यातील काही जनावरांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून या जनावरांचा मृत्यू हा हिरव्या चाऱ्यातून झालेल्या विषबाधेतून झाला असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे डॉ. थोरे यांनी सांगितले.
त्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांना चारा घालताना काळजी घ्यावी. शक्यतो वाळलेला चारा द्यावा. औषध फवारणी केलेला चारा देऊ नये, असे आवाहन देखील डॉ. थोरे यांनी केले आहे.