लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : जिल्हा बँकेचे संचालक तथा माजी आमदार शिवाजीराव कर्डिले व भानुदास मुरकुटे यांनी भंडारदऱ्यात फेरफटका मारत असताना चक्क एकमेकांविरोधात शड्डू ठोकला. राजकीय आखाड्यात एकमेकांविरोधात डाव टाकणाऱ्या दोन्ही नेत्यांची प्रत्यक्षातील कुस्ती मात्र बरोबरीत सोडविली. त्यांच्या भर पावसातील कुस्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी भंडारदरा येथील शेंडीच्या शाखेत झाली. बैठकीला अध्यक्ष ॲड. उदय शेळके, माजी अध्यक्ष सीताराम गायकर, माजीमंत्री तथा संचालक अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास मुरकुटे, अमोल राळेभात आदी उपस्थित होते. भंडारदऱ्यात पाऊस सुरू असल्याने तेथील निसर्गही चांगलाच खुलला आहे. त्यामुळेच संचालक मंडळाने ही बैठक भंडारदऱ्यात ठेवली असावी. बैठक आटोपून संचालक मंडळ फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले. पाऊस असल्याने नेहमीचा पांढरा शुभ्र पोशाख नेत्यांनी परिधान केला नव्हता. सर्व संचालक स्पोर्ट शूज, टीशर्ट आणि पॅन्ट या पोशाखात होते. भंडारदऱ्याच्या पुढे निघाल्यानंतर नेत्यांच्या वाहनांचा ताफा नॅकलेस फॉलजवळ थबकला. भर पावासात सगळे संचालक गप्पा मारत फॉलकडे जायला निघाले. फिरताना काहींनी एकमेकांची मजा घेतली. माजी आमदार मुरकुटे यांनी कर्डिले यांना डिवचले. जिल्ह्याच्या राजकारणात किंगमेकर म्हणून ओळखले जाणारे कर्डिले तसे पहिलावानाच. त्यांनी दंड थोपटला. मुरकुटेही माघार घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेही पुढे सरकले. दोघांनी एकमेकांच्या दंडाला धरत चितपट करण्याचा प्रयत्न केला. भर पावसात या दोन्ही नेत्यांतील कुस्ती बराचवेळ सुरू होती. अखेर संचालक मंडळाने कुणाला इजा होऊ नये, म्हणून गायकर व माजी मंत्री म्हस्के यांनी मध्यस्थी करत कुस्ती सोडविली. दोघांचे हात वर करून कुस्ती बरोबरीत सुटल्याचे जाहीर केल्याने संचालक मंडळात एकच हंशा पिकला.
....
बैठक संपून पर्यटन
सध्या भंडारदरा परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. तेथील धबधबे पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने बैठकच भंडारदऱ्यात बोलावली. बैठक सकाळीच असल्याने सर्व संचालक भल्या सकाळीच भंडारदऱ्यात दाखल झाले. बैठक संपून नेत्यांनी भंडारदऱ्यात फेरफटका मारला.