आॅनलाईन लोकमतजामखेड (अहमदनगर), दि़ ६-अयोध्या येथे राम मंदिर उभारण्यासाठी संसदेने कायदा करावा, अशी मागणी करीत विश्वहिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने जामखेड येथून रामजन्मभूमी जागृती अभियानास गुरुवारी (दि़६) प्रारंभ करण्यात आला़ या अभियानाच्या निमित्ताने जामखेड शहरातून वाद्यवृंदाच्या गजरात प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील गणपती मंदिर येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला़ प्रभू रामचंद्र यांच्या पाच फूट उंचीच्या प्रतिमेसह छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचीही प्रतिमा सजवलेल्या रथात ठेवण्यात आली. रथाच्या समोर ढोलपथक, हलगी पथक, बँजो, भगवाध्वज पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते़ या मिरवणुकीत भारतमाता की जय, वंदे मातरम अशा घोषणा देत अयोध्येत राममंदिर व्हावे, अशी मागणी करण्यात आले़ ही मिरवणूक जयहिंद चौक, उभी पेठ मार्गे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आली़ यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष विवेक कुलकर्णी म्हणाले, गुढीपाडवा व हनुमान जयंती निमित्त रामजन्मभूमी जागृती अभियान सुरू आहे. परकियांनी सोरटी सोमनाथ मंदीर पाडले होते. सरदार वल्लभ पटेल यांनी देशाच्या संसदेत कायदा करून तेथे मंदिर बांधले. याच धर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत कायदा करून अयोध्येत राम मंदीर बांधावे अथवा अखिल भारतीय रामजन्मभूमी न्यास समितीला अयोध्येत मंदिर बांधण्यास परवानगी द्यावी. अयोध्येची ८४ कोशी सिमाच्या आत अन्यधर्मिय प्रार्थनास्थळ नसावे, बाबर हा परकीय आक्रमक होता. त्याच्या नावाने हिंदुस्थानमध्ये प्रार्थनास्थळ होऊ नये अशा विविध मागण्यांचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाहक विनोद उगले, विश्व हिंदू परिषदेचे तालुका अध्यक्ष दिपक काशीद, बजरंग दल तालुका अध्यक्ष आकाश पिंपळे, सुयश पांडव, डिगांबर राळेभात, संदीप राळेभात, डॉ. प्रशांत शहाणे, नारायण राऊत यांच्यासह असंख्य स्वयंसेवक मिरवणुकीत सहभागी होते. विविध मागण्यांचे वाचन झाल्यानंतर मिरवणूक विसर्जन करण्यात आली.
जामखेड येथे रामजन्मभूमी जागृती अभियान; मंदिर उभारण्याची मागणी
By admin | Updated: April 6, 2017 15:40 IST