अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असून उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही नऊ हजारांच्या वर गेली आहे. त्यामुळे रेमडेसिवीर या इंजेक्शनची गंभीर रुग्णांना आवश्यकता भासत आहे. अशा स्थितीत मागणी वाढल्याने आणि उपलब्धता मर्यादित असल्याने इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. खासगी रुग्णालयांमध्ये एका इंजेक्शनचा दर पाच हजारांच्या पुढे गेल्याने रुग्णांच्या नातेवाइकांची पळापळ सुरू झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गात वाढ झाली आहे. एकाच दिवशी १२००, १३०० जणांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांत तर १८००, १९०० इतके रुग्ण एकाच दिवशी आढळून येत आहेत. त्यामुळे उपचार घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. जे रुग्ण गंभीर आहेत, त्यांना रेमडेसिवीर इंजेक्शन दिले जाते. मात्र जिल्ह्यात या इंजेक्शनचा सध्या तुटवडा जाणवत आहे. याबाबतची कबुली गत आठवड्यात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीही पत्रकार परिषदेत दिली होती. त्यामुळे कोणत्याही प्रकारे इंजेक्शनचा तुटवडा होणार नाही आणि रास्त दरात इंजेक्शन मिळतील, याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या होत्या. ग्रामीण भागातही इंजेक्शन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
--------------
जिल्ह्यात दर दिवशी २५०० इतक्या रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी केली जात असून तेवढी उपलब्धता होते आहे. कुठे तुटवडा जाणवत असेल, तसेच कोणाकडून दर वाढवून घेतले जात असतील, तर रुग्णांच्या नातेवाइकांनी थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा. हे इंजेक्शन १२०० रुपयांपर्यंत उपलब्ध करून देण्याबाबत विविध कंपन्यांशी चर्चा झाली आहे. मात्र जिल्ह्यात सध्या कोणताही तुटवडा नाही. रुग्णांची संख्या वाढत असल्याने अधिकची इंजेक्शन मागविण्याचे नियोजन केले आहे.
- अशोक राठोड, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
-------------
रेमडेसिवीर इंजेक्शन मागणीप्रमाणे उपलब्ध होत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या इंजेक्शनचे दर वेगवेगळे असून ते अगदी आठशेपासून अठराशेपर्यंत आहेत. शिवाय सध्या रुग्णसंख्या वाढल्याने मागणीही वाढली आहे. नगर शहरामध्येच एक हजार इंजेक्शनची कमतरता भासत असल्याने औषध विक्रेत्यांची धावपळ होत आहे. आधार कार्ड, प्रिस्क्रिप्शनशिवाय आम्ही कोणालाही इंजेक्शन देत नसल्याने काळाबाजार होण्याचा प्रश्नच नाही.
- दत्ता गाडळकर, अध्यक्ष, केमिस्टस असोसिएशन, अहमदनगर
--
रेमडेसिवीर इंजेक्शन फोटो