श्रीगोंदा : अडचणीच्या चटक्यांनी जेव्हा भावना करपतात तेव्हा जिवंतपणीच माणसं स्मशानभूमीकडे सरकतात..!
गावची स्मशानभूमी, शहरातील अमरधाम म्हटले की माणसाचे शेवटचे निवाराधाम. या धामात माणसं फक्त अंत्यसंस्कारसमयी उपस्थित राहतात. नंतर तिकडे फारसे कोणी फिरकत नाही; परंतु श्रीगोंद्याच्या याच अमरधामात रामदास वाघमारे हा इसम गेल्या कित्येक दिवसांपासून भाकरीचा शोध घेतोय.
पूर्वी गरीब कुटुंबांतील महिला स्मशानात राखेतील सोने शोधण्यासाठी धडपड करायच्या. बदलत्या सामाजिक प्रवाहात स्मशानातील सोने शोधण्याचे बंद झाले. माणूस पंचतारांकित जीवन जगू लागला. श्रीगोंद्याच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार झाले की रक्षा जमा करण्याचा विधी होतो. हा विधी झाला की त्या ठिकाणी मृत व्यक्तीसाठी ठेवलेले अन्न, मिठाई आणि चहा यावर श्रीगोंद्यातील रामदास वाघमोडे आपली भूक भागवितात. हे ग्रहस्थ गेल्या तीन वर्षांपासून याच अमरधामात असून, येथेच उदरनिर्वाहाचे साधन शोधत आहेत. फावल्या वेळेत ते या परिसराची साफसफाईही करतात आणि आपला दिवस आनंदाने अमरधाममध्ये घालवितात. वाघमारे यांचे मूळ गाव सोलापूर; पण लहानपणी आई-वडिलांचे छत्र हरपले आणि रामदास श्रीगोंद्यात आले. त्यांनी स्वत:साठी घर घेतले. नातेवाईकांनी रामदास यांना चांगले शिकविले. पुढे त्यांनी बीए.बीएड.ची पदवीही घेतली; परंतु त्यानंतर त्यांनी नोकरी केली नाही आणि लग्नही केले नाही. पुढे त्यांचे अलिप्त जीवन सुरू झाले. सुरुवातीला ते सिद्धेश्वर घाट परिसरात ध्यानस्थ होत. आता गेल्या तीन वर्षांपासून रामदास हे अमरधाममध्येच जीवन जगत आहेत.
--------
मदतीची अपेक्षा नाही
वाघमारे यांच्याशी ‘लोकमत’ प्रतिनिधीने संवाद साधला असता, ते म्हणाले, मी पदवीधर आहे. पुणे विद्यापीठात शिकलो, पण नशिबाने साथ दिली नाही. जीवनात कधीच कुणाचा आधार घेतला नाही. परिस्थितीनुसार जीवन जगत राहिलो. मृत व्यक्ती अन्न खात नाही. ते अन्न खराब होण्यापेक्षा मी त्या अन्नावर माझी भूक भागवितो. वाघमारे यांना मदतीबाबत विचारले असता त्यांनी त्यासही नकार दिला. मला स्वत:चे घर आहे. अन्न, कपडे अमरधामात मिळतात. त्यामुळे मला मदतीची गरज नाही. मी आहे त्या परिस्थितीत आनंदी आहे, असे सांगत ते निघून गेले.
--------
फोटो - १६ रामदास वाघमारे
श्रीगोंद्याच्या अमरधाममध्ये रामदास वाघमारे हे गेल्या कित्येक दिवसांपासून उदरनिर्वाह भागवीत आहेत.