पाटबंधारे विभागाने निळवंडे धरणाच्या टनेल दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. टनेलची पाणीपातळी धरणाच्या ६१० मीटर तलांक इतकी आहे, तर धरणाच्या कडेला राजूर नळपाणीपुरवठा करणारी विहीर आहे. या विहिरीची पाणी पातळीही धरणाच्या ६१० मीटर तलांक इतकीच आहे. हे काम दुरुस्ती करणे अत्यावश्यक असल्याने पाटबंधारे विभागाने निळवंडे धरणातील पाणी सोडून दिले आहे. राजूर पाणीपुरवठा विहिरीची पाणी पातळी यामुळे खाली गेली आणि पाणीपुरवठा करणारे विद्युतपंप उघडे पडले आणि पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाली. त्यामुळे भरउन्हाळ्यात राजूरकरांना पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
टनेल दुरुस्तीच्या कामासाठी किमान आठ दिवस लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाचे सहायक अभियंता अभिजित देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे राजूरचा नळपाणीपुरवठा टनेल दुरुस्ती होईपर्यंत बंद राहणार आहे.
जॅक वेलच्या पाणीपातळीच्या खाली निळवंडे धरणाचे पाणी गेल्यामुळे इतक्या दिवस सुरळीत चालू असलेली नळपाणीपुरवठा योजना अडचणीत सापडली आहे. धरणाच्या टनेल दुरुस्तीस आठ दिवस लागणार असल्याचे पाटबंधारे विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले. यात काही अडचणी लक्षात घेऊन गावची पाणीपुरवठा योजना दहा दिवस बंद राहणार असल्याची दवंडी गावातून दिली आहे. त्यामुळे दहा दिवस ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच गणपत देशमुख यांनी ग्रामपंचायतच्या वतीने केले आहे.