जामखेड : राजर्षी शाहू महाराजांनी समाजातील दीनदुबळ्या, वंचित घटकांचा उद्धार करण्याचे काम केले. ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून शाहू महाराजांचे सामाजिक काम पुढे नेण्याची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली जात आहे, असे प्रतिपादन प्रा. शहाजी डोके यांनी केले.
ग्रामीण विकास केंद्र संचलित निवारा बालगृहाच्या वतीने समता भूमी मोहा फाटा (जामखेड) येथे आयोजित राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. मोहा गावचे सरपंच शिवाजीराव डोंगरे अध्यक्षस्थानी होते. यावेळी ग्रामीण विकास केंद्राचे संस्थापक ॲड. डॉ. अरुण जाधव, संचालक बापू ओहोळ, जालिंदर यादव, बाळगव्हाणचे सरपंच कृष्णा खाडे, उपसरपंच राहुल गोपाळघरे, तरडगावच्या सरपंच संगीता केसकर, निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजिनाथ केसकर, भगवान राऊत आदी उपस्थित होते.
यावेळी द्वारका पवार, जालिंदर यादव, अनिल लष्कर यांचीही भाषणे झाली. युथ विथ अ मिशन या सामाजिक संस्थेच्या वतीने निवारा बालगृहातील मुला-मुलींना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून बचाव करणारे व त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे औषधे, गोळ्या, वाफेचे मशीन, मास्क, सॅनिटायझर आदींचे वाटप करण्यात आले.
निवारा बालगृहाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी गीता बर्डे, वैष्णवी शिंदे, करण, काजल यांनी स्वागत गीत, अभिवादन गीत तर शेषराव वाघमारे यांनी तुकडोजी महाराजांचे गीत सादर केले. यावेळी अशोक निमोणकर, अविनाश बोधले, धनराज पवार यांचा सन्मान केला. बापू ओहोळ यांनी प्रास्ताविक केले. संतोष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. तुकाराम शिंदे यांनी आभार मानले.
---
२८ मोहा फाटा
मोहा फाटा येथे राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करताना प्रा. शहाजी डोके, ॲड. डॉ. अरुण जाधव, सरपंच शिवाजीराव डोंगरे व इतर.