आठवडाभरापूर्वी धामणगाव आवारी येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार केली. हा शेतकरी धामणगाव आवारी येथील होता; मात्र ही घटना या गावाला लागूनच असलेल्या धुमाळवाडी शिवारात घडली होती. त्यामुळे या परिसरातील नागरिक अद्यापही दहशतीखाली आहेत. यापूर्वीही बिबट्यांनी धामणगाव आवारी परिसरात शेळ्या, कुत्री, वासरे, कोंबड्यांची शिकार केली आहे. बिबट्याने माणसावर हल्ला करून त्याची शिकार केल्याने या नरभक्षक बिबट्याकडून पुन्हा लोकांवर हल्ला होऊ नये, यासाठी नागरिकांनी सजग राहावे म्हणून वन विभागाच्यावतीने गावात भित्तीपत्रके लावून जनजागृती सुरू केली आहे.
...................
अशी घ्या काळजी
बिबट्या रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतो. त्यामुळे रात्रीचे एकट्याने घराबाहेर पडणे टाळावे. पाळीव प्राण्यांना बंदिस्त व सुरक्षित जागी ठेवावे. रात्री घराचे दरवाजे व्यवस्थित बंद करावेत. रात्री घराबाहेर उघड्यावर झोपणे टाळावे. रात्री वृद्धांना व लहान मुलांना एकटे सोडू नये. रात्री बाहेर फिरताना सोबत बॅटरी, काठी असू द्यावी. मोबाइलवर मोठ्या आवाजात संगीत लावावे. घरापासून थोड्या सुरक्षित अंतरावर पीक लावावे. घराजवळ रात्री विजेचा मोठा दिवा लावावा. घराजवळ झाडे झुडपे असेल तर तो भाग स्वच्छ करून घ्यावा. अचानक बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करावा. बिबट्याचा आपल्या आसपास वावर दिसल्यास तत्काळ वन विभागाला माहिती द्यावी, असे आवाहन या भित्तीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
------
ही भित्तीपत्रके सर्वत्र लावण्यात येत आहेत. रात्री जनजागृती प्रचारार्थ वन विभागाच्यावतीने गावागावांतून वाहनही फिरविण्यात येत आहेत. बिबट्याकडून हल्ला होणार नाही, यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी. जनजागृतीसाठी गावातील जागरूक नागरिकांनीही सहकार्य करावे.
- बी.एम.पोले, वनपरीक्षेत्र अधिकारी, अकोले प्रादेशिक.