लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: भूतकरवाडी येथील महापालिकेच्या शाळेभोवती संरक्षण भिंत बांधण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे महापौर रोहिणी शेंडगे यांनी सांगितले.
महापौर शेंडगे यांनी येथील केडगाव व भूतकरवाडी शाळेला भेट देऊन पाहणी केली. यावेेळी सेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, नगरसेवक सचिन शिंदे, विजय पठारे, उपायुक्त प्रदीप पठारे आदी उपस्थित होते. महापौर शेंडगे म्हणाल्या, केडगाव ओंकारनगर शाळेची सध्याची जागा अपुरी आहे. त्यामुळे पुढील वर्ग घेता येत नाहीत त्यासाठी केडगावधील महापालिकेच्या खुल्या जागेचा शाेध घेऊन तिथे वर्ग खोल्या बांधण्यात येतील, असे शेंडगे यांनी सांगितले.
त्यानंतर महापौर शेंडगे यांनी भूतकरवाडी येथील मनपाच्या शाळेची पाहणी केली. भूतकरवाडी शाळा मध्यवस्तीत शाळा आहे. त्यामुळे शाळेला संरक्षण भिंत शाळेला वॉल कंपाऊंड बांधण्याबाबत नगररचना विभागाकडून अभिप्राय घेऊन काम सुरू करणार शाळेमध्ये एक डिजिटल वर्ग असून दुसरा वर्ग सुरू करणार आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांनी सांगितले की, मनपाच्या प्रत्येक शाळा खोल्यांचे वर्ग वाढविण्यात येणार आहे. वर्ग वाढविल्यामुळे पटसंख्या वाढेल. गोरगरीब नागरिकांच्या मुलांना शिक्षण घेण्यासाठी मनपाच्या शाळेचा उपयोग होणार आहे. ओंकारनगर शाळेला न.पा. व मनपा शिक्षक संघाकडून राज्यस्तरीय आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे. अहमदनगर महानगरपालिकेची पहिली शाळा आयएसओ मानांकन प्राप्त शाळा पुरस्कार मिळाला आहे. शाळेमध्ये शालेय परसबाग न्यायरचना अध्यापन, १०० टक्के उपस्थितीसाठी दरमहा बक्षीस, प्रत्येक विद्यार्थ्याला वाढदिवसाला रोप व पुस्तक भेट, क्रीडा स्पर्धा राबविणे , विद्यार्थी बचत बँक तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे आयकार्ड दिले आहे, असे त्यांनी सांगितले.