अहमदनगर : फेसबुकवरील बदनामीकारक मजकूर प्रकरणी शहरासह जिल्ह्यातील शिवप्रेमी रविवारी रस्त्यावर उतरले़ विविध महामार्गांवर रास्ता रोको, मोर्चा काढून विविध संघटनांनी निषेध व्यक्त केला़ याप्रकरणी ११ जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ त्यामुळे शहराच्या काही भागात तणाव निर्माण झाला होता़ परंतु दुपारनंतर सामंजस्याशी भूमिका घेतल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले. दरमान, शहरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे़ या घटनेच्या निषेधार्थ इम्पिरीयल चौकात युवकांनी काल शनिवारी रात्रीच रस्ता रोको केला होता़ परंतु लोकप्रतिनिधींनी समजूत काढल्यानंतर वातावरण काहीसे निवळले होते़ मात्र रविवारी सकाळीच शहरातील वातावरण पुन्हा तणावग्रस्त बनले. शिवसेनेच्या वतीने सकाळी नगर- मनमाड महामार्गावर बोल्हेगाव येथे रास्ता रोको करण्यात आला़ यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली़ शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता़ सेनेच्या वतीने शहर बंदची हाक देण्यात आली होती़ त्यास प्रतिसाद मिळाला़ आ़ अनिल राठोड यांच्या नेतृत्वाखाली सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला़ यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत व्यापार्यांना बंदीची हाक दिली़ आ़ राठोड यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांची भेट घेऊन निवेदन दिले़ त्यानंतर काहीच वेळात महापौर संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून राष्ट्रवादी, मनसे आणि हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला़ माळीवाडा, पंचपीर चावडीमार्गे हा मोर्चा कोतवाली पोलीस ठाण्यावर धडकला़ यावेळी पोलीस निरीक्षक वाय़ डी़ पाटील यांना निवेदन देऊन मोर्चा माघारी फिरला असता पंचपीर चावडी येथे कार्यकर्त्यांनी किरकोळ दगडफेक केली़ त्यामुळे या परिसरात काही वेळ तणाव निर्माण झाला होता़ मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला़ याप्रकरणी कोतवालीत ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला़ सर्जेपुरा येथे दुचाकीचे टायर फोडण्यात आले़ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावरील गर्दी हटविली़ परिस्थिती दुपारनंतर नियंत्रणात आली. शहरात जमाव बंदी लागू केली आहे़ (प्रतिनिधी)
शिवप्रेमींकडून निषेध, मोर्चा, बंद
By admin | Updated: June 2, 2014 00:38 IST