श्रीरामपूर : खताचा बनावट कारखाना श्रीरामपूरमध्ये उघडकीस आला. यापूर्वीही या कारखान्यावर कारवाई करण्यात आली होती. कृषी खात्याच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. कारखान्याचा मालक फरार झाला.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सतीश बाळासाहेब केळगंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलिसांनी सम्राट अॅग्रो बायटेक या तथाकथित कंपनीचे मालक डी. एच. काळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. श्रीरामपूर एम. आय. डी. सी.जवळ हा कारखाना आहे. दोन दिवसांपूर्वी निलंगा (जि. लातूर) येथे सम्राट मॅक्स कॅल्शिअम मॅग्नेशिअम सल्फर या खताची वाहतूक करताना एक ट्रक पडला होता. त्यातून शेतकऱ्यांना विनापरवाना खत विकले जात होते. या खतांच्या गोण्यांवर सम्राट अॅग्रो बायोटेक गट क्रमांक १६७/३८-३९, सूतगिरणी गेट, एम. आय. डी. सी. जवळ, दिघीरोड, श्रीरामपूर असा पत्ता असल्याचे विभागीय कृषी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व्यवहारे यांना दिसले. त्यांनी ही माहिती पुण्याच्या कृषी आयुक्तालयास कळविली. तेथील तंत्र अधिकारी, विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सुभाष पांडुरंग गावंडे यांनी नगरचे जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक केळगंद्रे, श्रीरामपूर पंचायत समितीचे खत निरीक्षक तथा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक गणेश अनारसे यांनी श्रीरामपूर शहर पोलिसांच्या मदतीने या बनावट खत कारखान्यावर मंगळवारी छापा टाकला. तेव्हा कृषी आयुक्तालयाचा परवाना न घेता बोगस लेबल लावून बनावट खत बाजारात विकून शेतकऱ्यांची व सरकारची फसवणूक केल्याचे दिसून आले. या छाप्यात ५ लाख ५२ हजार रूपये किंमतीचा खताचा साठाही जप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)या बनावट खताच्या गोण्यांवर सी. ए. १० टक्के, एम.जी.ओ. ५ टक्के, एस. १० टक्के, सम्राट मॅक्स उत्पादक सम्राट अॅग्रोबायोटेक, एम.आय. डी. सी. जवळ, सूतगिरणीगेट, दिघीरोड, श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर असा तपशील होता. प्रत्येकी ४० किलो वजनाच्या २५६ सील केलेल्या गोण्या जप्त केल्या. त्यांची प्रत्येकी किंमत ७५० रूपये होती. शिलाई न केलेल्या २२० गोण्या, कच्च्या मालाच्या प्रत्येकी ५० किलो वजनाच्या २६० गोण्या जप्त करण्यात आल्या.
बनावट खत कारखान्यावर छापा
By admin | Updated: June 19, 2014 00:10 IST