सुदाम देशमुख, अहमदनगरविधानसभेच्या निवडणुका शांतता व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चौदाशे जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर चौदाशे जणांना वॉरंट बजावण्यात आले आहे. राजकीय नेत्यांच्या सभा आणि उमेद्वारांच्या प्रचारासाठी चौख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.जिल्ह्यात झालेली लोकसभा निवडणूक शांततेत पार पडली. पाथर्डी तालुक्यातील किरकोळ प्रकार वगळता जिल्ह्यात निवडणूक शांततेत पार पडली. कायदा व सुव्यवस्थेचा कुठेही प्रश्न निर्माण झाला नव्हता. लोकसभेआधी झालेली नगर महापालिका निवडणूकही शांततेत पार पडली. विधानसभा निवडणूकही शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडावी,यासाठी पोलीस अधीक्षक लखमी गौतम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, सुनीता ठाकरे-साळुंके यांनी कंबर कसली आहे. जिल्ह्यामध्ये १२ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून १३८ उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच ठिकाणी पंचरंगी लढती आहेत. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे पोलीस दलाचीही कसोटी लागणार आहे. जिल्ह्यात सध्या कार्यरत नव्याने आलेले वरिष्ठ अधिकारी, तसेच निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची जिल्ह्यातील ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे पोलिसांना मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी पोलीस दलाने आचारसंहिता लागल्यानंतर उपाययोजना आणि प्रतिबंधात्मक कारवाया सुरू केल्या आहेत. आचारसंहिता लागण्याआधीही पोलिसांनी कारवाई करून गुन्हेगारांचा छडा लावला आहे. जिल्ह्यात तब्बल साडेचार हजार जणांकडे शस्त्र परवाने आहेत. आतापर्यंत निम्मेच म्हणजे दोन हजार शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर १४ गावठी कट्टे, ६७ जीवंत काडतुसे, दोन तलवारी आदी साहित्य जप्त करण्यात आले आहे.ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल झालेले आहेत, तसेच निवडणुकीमध्ये शांतता भंग करण्याची शक्यता आहे, अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.तब्बल १ हजार ४०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी फरार आरोपींचा शोधही जारी ठेवला आहे. दारुबंदी, जुगार, आचारसंहिता भंगाची कारवाईही वेगाने सुरू झाली आहे. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होवू नये, यासाठी दक्षता घेतली जात आहे, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने ११७ गुन्हेगारांच्या तडीपारीचे प्रस्ताव संबंधित प्रांताधिकाऱ्यांकडे पाठविले होते. त्यातील ४३ जणांना आतापर्यंत तडीपार करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत अद्यापही काही जणांवरील कारवाई प्रक्रियेत आहे.
प्रतिबंधक कारवाईचा धडाका
By admin | Updated: October 6, 2014 23:55 IST