पाचेगाव : नेवासा तालुक्यातील पाचेगाव येथे तीन दिवस वैदिक मंत्रोच्चारात मोहटादेवी आणि भवानीमातेच्या नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा तसेच नवीन मंदिर जीर्णोद्धाराचा कार्यक्रम रविवारी उत्साहात पार पडला.
वैदिक पद्धतीने पूजा करून वेदपठणाच्या मंत्रोच्चारात मोहटादेवी आणि भवानीमातेच्या नवीन मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला शुक्रवारी सुरुवात करण्यात आली. शनिवारी दोन्ही मूर्ती गहू, तांदळाच्या राशीत पूर्णपणे झाकण्यात आल्या. यावेळी पाच फुटी कळसाचीही पूजा करण्यात आली. त्यानंतर नव्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
रविवारी गावातील मोहटादेवी तरुण मंडळातील युवकांनी मोहटादेवी गडावरून पायी ज्योत आणली होती. होमहवनानंतर महाप्रसादाच्या वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जुन्या मूर्तींचे गंगेत विसर्जन करण्यात आले.
तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात गावातील तरुणांचे विशेष सहकार्य लाभले. मंदिर निर्माण समितीच्या सर्व सदस्यांच्या देखरेखीखाली हा कार्यक्रम यशस्वीरीत्या झाला.
--
लोकवर्गणीतून मंदिर उभारणी...
गतवर्षी जून महिन्यात मंदिराच्या आधुनिक पद्धतीच्या नवीन बांधकामाला सुरुवात करण्यात आली. मंदिर निर्माणासाठी पूर्ण एक वर्षाचा कालखंड लागला. सहा लाख नव्वद हजार रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या नवीन मंदिरासाठी गावातील अनेक दानशूर लोकांनी सढळ हाताने मदत केली. नाशिक येथून साठ हजार रुपये खर्चून मोहटादेवी आणि भवानी माता यांच्या मूर्ती आणण्यात आल्या होत्या.
---
२१ पाचेगाव
पाचेगाव येथे उभारण्यात आलेले आकर्षक मंदिर आणि प्राणप्रतिष्ठा केेलेल्या मोहटादेवी, भवानीमातेच्या मूर्ती.