पारनेर : बेकायदा बैठक घेऊन प्राथमिक शाळांना गणवेश घेण्यासाठी दुकानाची सक्ती करणाऱ्या पंचायत समिती सदस्याने दबावातून निघोजमधील दहा प्राथमिक शाळांना गणवेश पाठवून दिल्याने मुख्याध्यापक, शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
पंचायत समितीचे सदस्य दिनेश बाबर यांनी बेकायदा मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन शिरूरमधील एका दुकानातून विद्यार्थ्यांना गणवेश खरेदी करावे, असा दबाव आणला होता. शिक्षक संघटनेचे नेते रा. या. औटी, प्रवीण ठुबे, संभाजी औटी, सूर्यकांत काळे, सुनील दुधाडे, संजय रेपाळे यांनी बाबर यांच्या दबावास विरोध केला होता.
‘लोकमत’ने हे प्रकरण चव्हाट्यावर आणल्यावर याप्रकरणी जिल्हा परिषदेने चौकशीचे आदेश दिले होते. याची चौकशी सुरू असतानाच त्या सदस्याने निघोजमधील शिक्षक, मुख्याध्यापक यांच्यावर दबाव आणून गणवेशाची ऑर्डर घेऊन गणवेश पाठविल्याने मुख्याध्यापक, शिक्षक यांच्यामध्ये नाराजी आहे.
----
सभापतींच्या नावाखाली बैठका
सभापती गणेश शेळके यांच्या नावाखाली ‘त्या’ पंचायत समितीचे सदस्याने काही केंद्र प्रमुख यांच्या मदतीने मुख्याध्यापक यांच्या बेकायदा बैठका घेतल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे सभापती शेळके यांनाच अडचणीत आणण्याचा डाव त्या सदस्याकडून होत असल्याचे काही मुख्याध्यापक, शिक्षक यांनी सांगितले.
----
‘त्या’ सदस्यावर कारवाई करा
गणवेशप्रकरणी जिल्हा परिषद मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख यांची चौकशी करणार असल्याचा निर्णय चुकीचा असून कोणत्याही मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख, शिक्षक यांना चौकशीच्या फेऱ्यात जिल्हा परिषदेने अडकवू नये, या निर्णयास शिक्षकांचा विरोध असल्याचे शिक्षक नेते रा. या. औटी, प्रवीण ठुबे, संभाजी औटी व शिक्षकांनी सांगितले. बेकायदा बैठक घेऊन शिक्षकांना गणवेशासाठी वेठीस धरणाऱ्या पंचायत समिती सदस्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिक्षक संघटनेने केली आहे.