संगमनेर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू असून शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये लस लवकर उपलब्ध होत नाही. काही ठिकाणी लसीकरणासाठी गर्दी होते. त्यामुळे अनेक जण खासगी रुग्णालयात जाऊन लसीकरण करून घ्यायला प्राधान्य देत आहेत.
कोरोनावर लसीकरण हाच एकमेव उपाय मानला जातो आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच लसीकरण केंद्रांवर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करण्यात येते आहे. काही खासगी रूग्णालयांमध्ये शुल्क आकारून कोरोना प्रतिबंधात्मक लस करण्यात येते. लोकसंख्येनुसार लसीकरण होणे गरजेचे असताना नागरिकांना शासकीय रुग्णालय अथवा प्राथमिक आरोग्य केंद्रात लस लवकर मिळत नाही.
पहिला डोस झाल्यानंतर अनेकांचा दुसरा डोस बाकी आहेत. दुसऱ्या डोस घेण्याची तारीख आल्यानंतर डोस घ्यायला गेलेल्या अनेकांना लस संपल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे असे अनेक जण लसीकरणापासून वंचित आहेत, त्यात ज्येष्ठ नागरिकांचा देखील समावेश आहे. अद्याप लसीचा पहिलाच डोस मिळाला नसल्याने असे हजारो नागरिक लसीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. संगमनेरातील एका खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू आहे. तसेच लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक पुणे, नाशिक येथील खासगी रुग्णालयात जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १६ जानेवारी ते १२ जुलै या दरम्यान १० लाख ५३ हजार ८६७ जणांचे लसीकरण करण्यात आले. त्यात ८ लाख ०३ हजार २१९ जणांनी पहिला तर २ लाख ५० हजार ६४८ जणांनी दुसरा डोस घेतला.
------------
अहमदनगर जिल्ह्यात झालेले लसीकरण
पहिला डोस - ८,०३,२१९
दुसरा डोस - २,५०,६४८
एकूण लसीकरण - १०,५३,८६७
------------
शुल्क आकारून लसीकरणाची तयारी
लसीकरणासाठी नोंदणी करूनही लस मिळत नाही. ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांवर जाऊन देखील लस मिळाली नाही. त्यामुळे आम्ही लसीकरणापासून वंचित असल्याने अनेक नागरिकांनी सांगितले. संगमनेरातील खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू व्हावे, आम्ही शुल्क आकारून लसीकरण करून घेण्यास तयार आहोत, असेही अनेकांनी सांगितले.
-----------
६० खासगी रुग्णालयांचे प्रस्ताव
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर, नगर, राहाता, संगमनेर, पाथर्डी, श्रीरामपूर येथील एकूण ६० खासगी रुग्णालयांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत. यात शहरी व ग्रामीण भागातील रुग्णालयांचा समावेश आहे.
---------------
आई-वडिलांसोबत नाशिक येथील एका खासगी रुग्णालयात जाऊन कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी असलेले शुल्क भरून आई, वडील आणि मी अशा तिघांनी लसीकरण करून घेतले. अगदी पंधरा मिनिटात आमच्या सर्वांचे लसीकरण झाले. लस घेऊन लगेचच संगमनेरात आलो.
- हर्ष मिलिंद कुलथे, रा. बाजारपेठ, संगमनेर