अहमदनगर : कोरोनाच्या नैसर्गिक आपत्तीमध्ये दीनदुबळ्यांची हवालदिल अवस्था, गोरगरिबांची आर्थिक दुर्बलता, रुग्णांची भयभीत मनस्थिती या सर्व गोष्टींचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या संकल्पनेतून अहमदनगर येथे महाराष्ट्रातील पहिले ‘प्रहार आरोग्य मंदिर’ सुरू होत आहे. येथे कोरोना रूग्णांवर उपचार, राहण्याची, तसेच भोजनाची मोफत सोय केली जाणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी यांनी दिली.
सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शासकीय, तसेच खासगी दवाखान्यात ही रूग्णांना जागा कमी पडत आहे. अनेक ठिकाणी बेड न मिळाल्याने रूग्णांची गैरसोय होत आहे. हे लक्षात घेता सामाजिक भावनेतून प्रहार संघटना कोरोना सेंटर सुरू करणार आहे. औरंगाबाद रोडवर शेंडी जवळ निसर्गरम्य स्थळी प्रहार करिअर अकॅडमी कार्यरत आहे. तेथेच हे सेंटर सुरू होणार आहे. संघटनेचे अजय महाराज बारस्कर आणि राज्य प्रवक्ते संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार कोविड सेवा शुश्रूषा केंद्र ही संकल्पना साकारली जात आहे. या आरोग्य केंद्रामध्ये रुग्णांच्या राहण्याची, जेवणाची व इतर व्यवस्था मोफत केली जाणार आहे. या संदर्भात रीतसर चर्चा आणि पाहणी करण्यासाठी मंगळवारी (दि. २०) तहसीलदार उमेश पाटील यांनी प्रत्यक्ष भेट दिली. तसेच चर्चा करून प्रहार कोविड सेंटरला मान्यता दिली. रुग्णांची संख्या वाढताच व गरज भासताच ४८ तास पूर्व सूचना देऊन रुग्णांना येथे पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी यांनी कोविड सेंटर संबंधी आवश्यक सोई सुविधांची माहिती तहसीलदारांना दिली. यावेळी उपाध्यक्ष देविदास येवले, सचिव प्रकाश बेरड, सल्लागार प्रा. मालोजी शिकारे, भागेश शिंदे व रुग्ण सेविका दीपाली पाटील आदी उपस्थित होते.
------------
फोटो - २०प्रहार पाहणी
औरंगाबाद रोडवरील प्रहार करिअर अकॅडमीमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याच्या अनुषंगाने तहसीलदार उमेश पाटील यांनी पाहणी केली. प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंह परदेशी यांनी त्यांचे स्वागत केले.