कुकाणा : तेलकुडगाव (ता. नेवासा) ते ढोरजळगाव (ता. शेवगाव) या अवघ्या चार किमी अंतर असलेल्या रस्त्याची अतिशय दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली आहेत.
रस्ता अतिशय खराब झाल्यामुळे ग्रामस्थांना दूरच्या मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यामुळे वेळेबरोबरच आर्थिक फटकाही ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे. तेलकुडगाव व ढोरजळगाव हा भाग ऊस पिकाचे आगर समजला जातो.
त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात ऊस वाहतूक होत असते. तसेच ढोरजाळगाव येथे घाडगे पाटील शैक्षणिक संकुल आहे. तेथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना येण्या-जाण्यासाठी हा रस्ता अतिशय सोयीस्कर आहे. तसेच पावसाळ्यात चिखल तुडवत शेतकरी, दुग्ध उत्पादक यांना जावे लागते. रस्ता पूर्ण चिखलमय होत आहे. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी तेलकुडगावचे सामाजिक कार्यकर्ते मधुकर काळे, सोपान काळे, गौतम काळे, संजय काळे, प्रसाद घोडेचोर, सुुुदाम काळे, संदीप काळे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
----
०९ तेलकुडगाव
कुकाणा-तेलकुडगाव ते ढोरजळगाव या रस्त्याची
झालेली दयनीय अवस्था.